” शिवडीचे पाहुणे “

मुंबई शहराची लांबलचक किनारपट्टी अनेक समुद्रपक्ष्यांसाठी आश्रयस्थान आहे. ठाण्याची खाडी,एलिफंटा गुंफा, उरण, मड-मानोरी खाडया पक्षीनिरीक्षणासाठी अतिशय उत्तम आहेत. परंतु या सर्वांपेक्षा शिवडीचा उपसागर एखाद्या दुपारी आपला श्वास रोखून धरतो.

वर्तमानपत्रातल्या फोटोमधून फ्लेमिंगो (रोहित ) पक्ष्यांची डौलदार काया बघितली. गुगलवर त्यांचे मोहक रंग पाहून मी मोहित झालो. त्यांची उडतानाची अदा, त्यांच्या थव्यांच्या विविध नक्षी पाहून त्यांना बघायचेच असा निश्चय केला.

वेड्यावाकड्या, मोडक्याफुटक्या रस्त्यावरून माझी गाडी गचके खात, खड्डे चुकवत पुढे जात होती. मान वर करून डावीकडे, एकदा उजवीकडे नजर फेकत मी त्यांना शोधत होतो. मुंबईच्या टेकड्यांवर वसलेली घरे, टेकड्यांच्या उतारावर फेकतात त्या पांढऱ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि घरातला कचरा. फ्लेमिंगो म्हणून पाहायला जावे आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यांची वेटोळी आढळावीत असे काहीसे झाले.

“छे ! नसतीलच असे काही पक्षी. कावळ्यांनाच मनातल्या मनात रंगवून गुलाबी केलं असेल आणि पसरवल्या असतील बातम्या, त्यांच्या मुंबईतल्या आगमनाच्या. ” विशाल, माझा मित्र निराशेने म्हटला. तोही भल्या पाहाटे उठून माझ्या आग्रहाखातर फ्लेमिंगो पाहायला निघाला होता.

” बघू या, निघालोय तर खरं त्यांच्या शोधात ” मला खात्री होती. ” पण एवढी उन्ह अंगावर आल्यावर ते फ्लॅमिंगो पक्षी काय फोटोसाठी पोझ द्यायला थांबणार आहेत आपल्यासाठी ? ” विशाल अधीर होत म्हणाला.

पुन्हा एकदा डोळे त्या गुलाबी कल्पनेला शोधू लागले. दूर कुठेतरी खडक आणि पाणी दिसले. खडकांच्या मधे मधे काहीतरी दिसत होते. नक्की तिथेच असतील ते पक्षी, मी स्वतःशीच पुटपुटलो. जवळ गेल्यावर दिसले, ते होते प्रेमी युगुलांचे अड्डे ! मुंबईसारख्या जागा नसलेल्या शहरात कुठलीही वेळ चालते या प्रणयी जोडप्याना प्रेम करण्यासाठी. एरवी त्यांची कीव येते पण आज रागच आला. हातातल्या घड्याळाकडे नजर गेली. सकाळचे पावणेअकरा वाजले होते.

” तू म्हटला होतास नऊ वाजेपर्यंत दिसतील ?” विशाल थांबत नव्हता. ” अरे, भारतीओहोटीच्या वेळांप्रमाणे गाठावं लागत या पाहुण्यांना.” मी त्याची अधीरता कशीबशी रोखत होतो.

” तो बघ एक बगळा ” मी जोरात ओरडलो, ” आणखीही दिसताहेत बघ…किती किती बगळे. ” मी आता उत्तेजित व्हायला लागलो होतो. ” हं घाण पाण्यात चोची बुडवणारे, झोपडपट्टीच्या शेजारी उंडारणारे ” विशालच्या आवाजात नाराजी होती. तो म्हटला, ” इथं मिठागर असतात ना ?” आम्ही बारकाईने पाहिले. मिठांच्या वाफ्यात पाणी दिसत होते. मिठाचा पत्ता नव्हता. झोपड्पट्टीतली काही मुले आणि मोठी माणसंही प्रातर्विधीला निवांत बसली होती.

मी हातात दुर्बीण घेतली. गुलाबी गुलाबी, उंच,शिडशिडीत हजारो कविता रोहित (फ्लॅमिंगो ) पक्षांच्या रूपाने सर्वत्र विखुरल्या. त्यांना कुणाचेच भान नव्हते. दुर्बीण क्षितिजभर फिरवली. हजारो फ्लॅमिंगोंचे थवे- आसमंतभर. आकाशात उडणारी त्यांची लयबद्ध टोळकी पंकाखाली रंगांची किमया फलकारत बेफिकीरीने उडत होती. मंत्रमुग्ध होऊन आम्ही त्यांना डोळ्यांत साठवत होतो.

कच्छहुन येतात हे पक्षी हिवाळ्यात,खाद्याच्या शोधात. तसे हे मूळचे आफ्रिकेतले. मी वाचले होते. ” कोण्या देशीचे पाखरू ” मी मनाशीच गुणगुणायला लागलो. आपल्या सुबक चोचींनी खाद्य टिपत, आपल्या सुडौल माना हलवत ते पक्षी भारतीसमवेत पुढे पुढे सरकत होते – आमच्या बाजूला. मला आठवते त्यांना ” अग्निपंख ” असेही म्हणतात. कित्येक क्षण मीही विसरलो होतो, की माणसांनी निर्माण केलेले शहराचे जंगल तुडवत, आम्ही एका स्वप्नांच्या प्रदेशात येऊन पोहचलो होतो.

आता आजूबाजूला फक्त रोहित पक्षी (फ्लेमिंगो) होते आणि त्यांच्या अंगावर सूर्याचे किरण पेलणारे त्यांचे अग्निपंख होते. मी होतो ते होते. ते होते… मी नव्हतोच !!

..विनय खातू (४.२.१९)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s