“ सभ्यतेचा आदर्श- अॅडव्होकेट ए.एच. खतिब “

काही माणसे उच्चपद पावोत वा न पावोत, परंतु ती अशी निराळ्या गुणावाणाची असतात की, त्यांचा समावेश कधीच त्यांच्या समकालीनांत होत नाही. विलक्षण चिवटपणाने कालौघाचा मंद वेग जलद करण्याचा अट्हास करणारे,भूत, वर्तमान, भविष्य अभेदाने पाहणारे, सर्वकाळाचे निःसंग प्रवासी प्रत्येक पिढीत असतात. असतात तिथे विक्षिप्त ठरतात. ध्यासावर त्यांचा विश्वास चालू असतो; एक तर अनावर कष्टाळूपणा; सतत काम किंवा अजिबात कामाविना चिंतन, तेही स्वैर चिंतन. अशा असतात या माणसांच्या जाती. खोटेपणाचा लवलेश त्यांना खपत नाही; ध्येयात व व्यवहारात कुठे फारकत त्यांना खपत नाही. आभाळावरच्या विश्वव्यापी न्यायासनाचे हे पाईक असतात. विद्ववता व मेहनतीची पताका उंच धरून ते अहर्निश भटकतात, घसा सुकेतोवर केवळ ज्ञानार्जनाचे आणि ज्ञान दानाचे उद्गान करतात आणि नाठाळांना शिव्या देऊन मोकळे होतात. त्यांचे बोलणे झाकून नसते; कृती शब्दानुसारी असते. असाच एक जातिवंत वकील महाडमध्ये जन्मला आणि आठवणींचा हिंदोळा बांधून निघून गेला. “अॅडव्होकेट ए. एच. खतिब.”

महाड तालुक्यातील तुडील ह्या छोट्याशा आणि स्वातंत्र्यपूर्व काळात अतिमागास गावात खतिब सरांचा जन्म एका कोकणी मुस्लिम कुटूंबात झाला. मला त्यांच्या बालपणाबद्दल आणि तारुण्यातील प्रवासाबद्दल फारसे माहित नाही त्यामुळे मी त्यावर बोलणे अप्रस्तुत आहे. एका छोट्याशा गावातून पुढे येऊन एम. ए. (इंग्लिश), एल एल.बी डिग्री त्यांनी प्राप्त केली. आपल्या इंग्लिशच्या जोरावर टाइम्स ऑफ इंडिया मधे मराठी टू इंग्लिश ट्रान्स्लेटर म्हणून नोकरी केली. त्या नोकरी दरम्यान इंग्रजीवरती कमालीचे प्रभुत्व मिळवले. नोकरी सोडून महाडला वकीली करण्याचा निर्णय घेऊन त्यांनी संपूर्ण जीवन वकीली व्यवसायास समर्पित केले. एक उत्कृष्ठ वकील कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खतिब सर ! जाड भिंगांचा चष्मा घालून पहाटे नमाज पढून झाला की दाव्यासंदर्भात अभ्यास करत बसणे. दाव्याचा अभ्यास करताना नवीन लाॅ पॉईंट मिळाल्यास त्यावर वाचत बसणे. आलेल्या अशिलाचे संपूर्ण समाधान होईपर्यंत त्याला केस समजावून सांगणे. चेहऱ्यावर कधीही अहंकाराचा भाव नाही. अशिलाला कायदा समजत नाही म्हणून आपल्याकडे आला आहे त्यामुळे त्याला त्याच्या केसबद्दल माहिती देणे हे वकिलाचे प्रथम कर्त्यव्य आहे हे त्यांचे वाक्य मला कायम स्मरणात राहिले.

मिश्किल स्वभाव आणि कायम कोट्या करत राहणे. समकालीन निष्णांत कायदेतज्ञ कै. सुधाकर (अण्णा) सावंत कै. ओक यांचे विरुद्ध आत्मविश्वासाने, सचोटीने कायद्याचा किस पाडून त्यांनी दावे चालवले. हे तिघे म्हणजे महाड कोर्टाच्या गौरवशाली विधिज्ञ पिढीचे त्रिमूर्ती होते. आपल्या प्रतिस्पर्ध्याला कमालीचा मान देणे परंतु समोर उभे ठाकल्यावर लकबीने गारद करणे हे सुसंकृत वकिलाचे लक्षण खतिब सरांमधे ठासून भरले होते. लँड लॉज् मधील त्यांचे ज्ञान वाखाणण्याजोगे होते. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम व बॉम्बे टेनन्सी अँड अग्रीकलचरल लँड्स ऍक्ट ह्या कायद्यांतील हरेक कलम आणि त्याचा व्यवहारातील उपयोग त्यांच्या इतका उमगलेला दुसरा वकील माझ्या तरी ऐकिवात आणि देखिवात नाही. दिवाणी कायद्यांवरील त्यांची पकड अजब होती. मला आठवते मी नुकताच वकील झालो होतो आणि एका कुळकायद्याच्या केस संधर्भात काही क्लिष्ट बाबी समजून घेण्याकरता सरांच्या घरी गेलो होतो. पुस्तकांच्या गराड्यात सर त्यांची मुस्लिम

टोपी डोक्यावर घालून काहीतरी वाचत होते. माझी केस वाचल्यावर मला समोरील कपाटातून एक लॉ जरनल काढायला सांगितले आणि त्यातील मुंबई उच्च न्यायालयाचा एक केस लॉ वाचायला सांगितले, एक चकार शब्दही माझ्याशी न बोलता अगर केसवर चर्चा न करता माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळून गेले होते. असेच एकदा त्यांच्याशी चर्चा करताना सन २००३ मध्ये त्यांनी रहिवासासाठी घर बांधावयाचे झाल्यास शेतजमिन बिनशेती करावी लागते हे गावपातळीवर जरा तापदायक आहे आणि म्हटले, “मी जर महसूल मंत्री असतो तर विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करून जमीन बिनशेती करण्याची आवश्यकता नाही असा ठराव ठणकावून संमत करून घेतला असता ,विनय तू बघ पुढे जावून ही तरतूद कायद्यात येईल ” सन २००५ साली महाराष्ट्र जमिन महसूल कायद्यामध्ये कलम ४४-क ची अमेंडमेंट होवून खऱ्याखुऱ्या रहिवासासाठी घर बांधावयाचे झाल्यास ग्रामीण भागात जमिन बिनशेती करण्याची आवश्यकता नाही अशी तरतूद करण्यात आली. असा हा काळाच्या पुढचा विचार करणारा कमालिचा प्रॅक्टिकल अँप्रोच असणारा विधिय्ज्ञ होता.

त्याचे इंग्लिश वरील प्रभुत्व जसे होते त्याहून मला त्यांचे मुस्लिम कुंटुबात जन्माला येवून सुद्धा मराठीवरील प्रभुत्व जास्त भावायचे. मी माझे भाग्य समजतो की, वकील झाल्यानंतर खतिब सरांकडे मी तासनतास जात असे आणि ते त्यांच्या दाव्यांच्या कामातील दावा-कैफियतीचे डिटेक्शन मला अव्याहतपणे देत असत. सुलभ,सुंदर,अस्खलित आणि अत्यंत प्रभावी असे मराठी. अगदी एखाद्या कसदार साहित्यिकाने लेख लिहावा तसे. शब्दांची फेक,मांडणी,संदर्भ,उदाहरणे जिथल्यातिथे. माझ्या आयुष्यात पू.ल, दुर्गा भागवत, जी.ए ,नेमाडे ,अरुण खोपकर,सुधा मूर्ती, मारुती चितमपल्ली, विजय तेंडुलकर यांच्या लिखाणाचे जसे गारुड आहे तेवढेच गारुड माझ्या लेखनशैलीवर अॅडव्होकेट खतिंबाचे आहे. महाडमधील प्रत्येक विद्यार्थ्याने सरांच्या मराठी भाषेवरील प्रभुत्वाचे आणि ते प्राप्तकरण्यासाठी त्यांनी केलेल्या अपार मेहनतीचे स्वतःचे मराठी सुधरायचे असेल तर अनुकरण करावे असे मला वाटते.

अत्यंत सरळ मार्गाने जीवन ते जगले. स्वतःला मुलबाळ नसल्याकारणाने बहीण आणि भावंडाची मुलं घरी घेवून येवून त्यांना पोटच्या मुलांच्या मायेने खतिब दांपत्याने लहानाचे मोठे केले आणि मुलांसकट मुलींना देखील उच्च शिक्षण दिले. आपल्या नातवंडाना शिकून मोठे होताना त्यांनी मुक साक्षीदाराप्रमाणे जीवन प्रवास चालू ठेवला.

कोर्टामध्ये समकालीन व नवीन पिढीतील वकीलांशी सुसंवाद आणि मजा मस्ती केली. कधीही कुठल्या वादात पडले नाहीत. राग, मत्सर, तिरस्कार, निंदा नालस्ती ह्या पासून कोसो दूर राहिले. कुठल्याही पदाची अभिलाषा नाही आणि प्रसिद्धीपासून चारहात लांब. महाड मधील आणि रायगड जिल्ह्यातील व्यावसायिक मंडळींचा सर्वात विश्वासू आणि हमखास वकील म्हणून त्यांनी प्रसिद्धी पावली होती. मला आठवते त्यांच्याकडे महाडमधील अनेक प्रसिद्ध व्यापारी व राजकारणी सल्ल्यासाठी बसलेले असायचे. भल्या पहाटेपासून रात्री झोपेपर्यंत केवळ वाचन आणि मनन असा त्यांचा विद्वतेचा तेज असलेला चेहरा मला आजदेखील डोळ्या समोरून जात नाही.

माझ्या कुटुंबावर त्यांचे विशेष प्रेम होते. माझ्या वडिलांच्या उमेदीच्या काळातील त्यांचा आधार आम्ही कधीच विसरू शकणार नाही. आम्हा भावंडाच्या शिक्षणाकडे त्यांचे जातीने लक्ष असे. माझा मोठा भाऊ अमित वकील झाल्यावर त्यांना अहो’ आनंद झाला होतो. अमितभाऊ आणि माझ्या वकील आणि इतर व्यावसायिक जडणघडणीत खतिब सरांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी दिवाणी कायद्यातील शिकवलेल्या क्लुप्त्या आजही कामी येतात. माझ्या भावाचे आणि माझे विधी क्षेत्रातील ते पहिले गुरु आहेत.

परवा खतिब सर गेले. वडिलांचा फोन आला आणि डोळ्यासमोर अविरत वाचनात मग्न, खुर्चीवर, दिवाणावर बसून कागदाच्या कपट्यांवर जाड भिंगाचा चष्मा घालून लिहीत बसलेले खतिब सर आठवले. वाचन, मेहनत, तयारी करून प्रत्येक केस हाताळणाऱ्या वकिलांच्या पिढीतील एक महत्वपूर्ण तारा निखळला हे नक्की.

असा होता हा एक परिपूर्ण सभ्य वकीलाचा बाणा !!

अॅडव्होकेट खतिब सरांना माझ्या कुटुंबीयांकडून श्रद्धांजली व त्यांच्या स्मृतीस विनम्र अर्पण 💐💐💐🙏🙏🙏

…विनय खातू (१६.०१.१९)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s