“ बनारसी अध्यात्म “

माझ्या सोलो ट्रॅव्हलींच्या दरम्यान काही दिवसांपूर्वी माझे बनारस (काशी) ला जाणे झाले. मागे काशी विश्वनाथ जोतिर्लिंगाचे दर्शन घेतले होते पण त्यावेळेस बनारस घाट आणि खास करुन नागासाधूना भेटायचे राहून गेले होते. अनेक पौराणिक पुस्तकांमधून नागासाधूंबद्दल ऐकले आणि वाचले होते. त्यामुळे त्यांचे जीवन आणि परमार्थमार्ग जाणून घ्यायचा होता. बनारस मधील एका मित्राच्या सहयोगामुळे नागासाधूंचा वावर असणाऱ्या परिसरात जाता येऊ शकले. परंतु नागासाधूच्या भेटिपूर्वी जीवनातील अनेक महत्वाच्या अनुभवांपैकी एक अनुभव येऊन गेला.

बनारस घाटावर प्राणसोडून तिथेच चितेस अग्नी प्राप्त व्हावा अशी इच्छा उत्तर भारतातील धार्मिक आणि श्रद्धाळू जनतेत आज सुद्धा आढळून येते. त्याकरता तेथील शासनाने अनेक वर्षांपासून घाटावरती स्वस्त दरात राहण्याची सोय म्हणून धर्मशाळा बांधल्या आहेत. आयुष्याची शेवटची घटका मोजणारे अनेकजण तेथे स्वइच्छेने येवून राहतात. मी नागा साधूंना भेटण्याकरता तेथेच धर्मशाळेत रहावयाचे ठरवले. तेथे रहात असताना शेजारच्या खोलीमध्ये एक नव्वद वर्षाचे गृहस्थ आणि त्यांचा मुलगा दोघे रहात होते. मी स्वतः जावून त्यांची विचारपूस केली. ते बुलंदशेर उत्तर प्रदेशचे रहिवासी होते. मुलगा एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये उच्चपद्स्थ्य अधिकारी होता. त्यांचा परिवार सुखवस्तू व संस्कृत होता हे मला लगेचच समजले. त्या सदगृहस्थ्यांचे शरीर वृध्दापकाळाने थकले होते. फॅमिली डॉक्टरने त्यांची काही दिवसात प्राणज्योत नैसर्गिक मृत्यूने मालवेल असे जाहीर केले होते. आणि म्हणून त्या गृहस्थांनी आपल्या मुलांकडे अशा प्रकारे गंगा घाटावरील मरण आणि अंत्यविधी प्राप्त व्हावा अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या ईच्छेचा आदर करून त्यांच्या धाकट्या मुलाने सर्व शासकीय परवानगीसह त्यांना गंगा घाटावर आणले होते. माझ्या नागासाधूंच्या भेटीमध्ये दिरंगाई होत चालली होती. त्यामुळे मी दिवसभर बनारस परिसर आणि इतरत्र फिरून येवून संध्याकाळी त्या भल्या गृहस्थाबरोबर बोलत बसायचो. त्यांचे जीवन समजून घ्यायचा प्रयत्न करायचो. ते त्यांच्या भूतकाळात रमायचे. ते एक शासकीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले होते. अतिशय सयंत आणि ठेहराव असलेला त्यांचा आवाज होता. बोलायला त्रास होत होता परंतु जमेल तेवढे बोलत बसायचे. ते अतिशय प्रामाणिक आणि सच्चाईने जीवन जगले. पैशाची हाव नाही. प्रसिद्धी पासून दूर. केवळ सचोटीने आपले काम करत राहीले. चांगल्या कामांसाठी शासन दरबारी अनेक पुरस्कार त्यांनी प्राप्त केले होते. हे सांगताना त्यांच्या डोळ्यात एक विलक्षण चमक दिसे. शासकीय काम निभावताना आलेले काही खास अनुभव ते मला सांगताना रोमांचित होत असत. त्यांचा प्रेमविवाह ! पत्नी एकाच शाळेतली. छान संसार करून त्यांना दोन मुलं व एक मुलगी झाली आणि त्यांनी ती मेहनतीनं वाढवली. सर्व मुलं कर्तबगार. मोठा बँकिंग क्षेत्रात अधिकारी म्हणून निवृत्त झाला आहे. मुलगी प्राध्यापक आणि सासरी सुखाने नांदते आहे. त्यांनी नातू-पणतू मांडीवर खेळवले. निवृत्ती पश्यात एका धर्मिक मंडळात ते भजन-कीर्तन करीत असत आणि त्या माध्यमातून त्यांच्या परिने समाज सेवा करत. एकंदरीत अतिशय सुंदर, हेवा वाटावा असे जीवन ते जगले होते.

डिसेंबर चा महिना आणि कडाक्याची बनारसची थंडी. असाच संध्याकाळी मी त्या गृहस्थाची बोलत बसलो होतो.आणि अचानक त्यांनी त्यांच्या मुलाकडे एक मागणी केली “बेटा मुझे गुलाबजामुन खाना है ।” त्यांचा मुलगा आणि मी त्यांच्याकडे विस्मयकारकरित्या बघत राहिलो.एवढ्या दिवसांत केवळ दाल चावल खावून शेवटची घटिका मोजणारे ते गृहस्थ आज गुलाबजामुन खाण्याची इच्छा व्यक्त करत होते. त्यांचा मुलगा त्यांना म्हणाला “पापा बनारस मार्केट तो यहा से दस-बारह किलोमीटर की दुरी पर है और आपको छोडके मै कैसे जा सकता हूँ l ” ते म्हणाले “बस मेरी आखरी ख्वाईश समजके खिला देना!” त्यावर तो मुलगा भाऊक झाला आणि उदगारला “पापा कृपया ऐसा ना कहिये,आप और खूब जीए,मै कितना भी वक्त आपके साथ यहा गुजारने के लिये तय्यार हू।” त्यांचा तो संवाद बघून मला त्या पित्या-पुत्राचा एवढा आदर वाटला की मी माझ्या वडिलांचा चेहरा आठवून फक्त डोळ्यातून अश्रू काढायचा बाकी होतो.

मी त्यांच्या मुलाला म्हटले “चाचाजी अगर आपको कोई ऐतराज नही है तो मै पापाजी के पास यहां आप आने तक बैठ सकता हूँ l त्यावर तो इसम समाधानी दिसला व त्वरित वडिलांसाठी गुलाबजामुन आणण्यासाठी बनारस मार्केट मध्ये निघून गेला .

मी त्या गृहस्था शेजारी अगदी उशाशी बसून बोलत होतो. ते भूतकाळातील गमती-जमती सांगण्यात रमले होते आणि अचानक बोलू लागले बेटा अब तक जो मैने आपको मेरी जीवन कथा सुनाई वह असल मे बहोत ही सुखकारक और बेहतरीन रही है ।मेरा सौभाग्य है मुझे एक उमदा पत्नी और होनहार बच्चे प्राप्त हुए l मै भगवान का तहे दिल से शुक्र गुजार हू के मुझे एसा जीवन जिने को मिला ।मै पुरी तरह से समाधानी हू ।लेकिन-लेकिन मैने आज तक जो जिंदगी जियी है उसे कई गुना जादा मुझे मौत कैसी आनेवाली है यह मायने रखता है ।

मी हे शेवटचे वाक्य ऐकून सदगदित झालो . एक इसम जो अतिशय प्रामाणिक सचोटीचे अनुशासनपूर्ण व समाधानाचे जीवन जगला तो त्याचा मृत्यू कसा येणार ह्याला तो जे सुंदर जीवन जगला त्यापेक्षा जास्त महत्व देतो ! किती मोठे आणि गहन काहीतरी ते मला सांगून गेले. माझ्या मनात विचाराचा काहूर माजला. किती वाईट पद्धतिने मृत्यू येत असतो. कुणी अपघातात चिरडून मरतो,कुणी जळून बुडून वाहून ,कुणाचा खून होतो, कोण अनेक वर्ष अंथरुणाला खिळून मरण यातना भोगत मरतो, कुणाला सर्पदंश -विचू दंशहोतो,कुणाला हृदयविकाराचा झटका, कुणाला ब्रेन हॅमरेज, तर कुणी जीवनातील समस्यांना तोंड देणे शक्य होत नाही म्हणून पळ काढून आत्महत्या करतो. किती वाईट मृत्यू हे.. मला त्या गृहस्थ्याचे वाक्य पटले. त्याने एवढे समाधानाचे जीवन जगल्यानंतर अनैसर्गिक व वेदनादाई मरण त्यांना आले तर काय त्या जीवनाला अर्थ राहिला?

“It is important how we lived our life but it is much much more important how we die” चांगले जीवन जगणे जितके महत्वाचे त्याहून चांगले मरण येणे अधिक महत्वाचे यामुळेच समर्थ रामदास म्हटले असतील ,”मरावे परी कीर्ती रूपे उरावे” खरच माणसाचे कर्तृत्व आणि जीवनाध्य त्याच्या अंत्ययात्रेला जमलेल्या लोकांच्या गर्दी वरून समजतो .

मी मनोमन काशी विश्ववनाथाला नमन करून या सदगृहस्थ्याला चांगले मरण प्राप्त व्हावे असे इच्छेले. थोड्या वेळात त्याचा मुलगा गुलाबजाम घेऊन आला एव्हाना त्यांना डोळा लागला होता. त्यांच्या मुलाने त्यांना उठवले आणि गुलाबजाम भरवला. साधारण अर्धा पावूण तास झाला असेल त्या गृहस्थ्याला घेरी लागली आणि आमच्या डोळ्या देखत त्यांनी प्राण सोडला. त्यांच्या मुलाने ईशवराला नमन केले आणि डोळ्यातील अश्रु रुमालाने पुसले. लगेचच अंत्यसंस्काराच्या तयारीकरता त्याने ब्राम्हणांना सूचित केले साधारण संध्याकाळचे पावणे सात वाजता त्यांची प्राण ज्योत मालवली.पहाटे चार वाजता मोठा मुलगा व इतर नातेवाईक तेथे दाखल झाल्यावर गंगा घाटावरती त्यांना अग्नी देण्यात आला.

मी जीवनातील ह्या विस्मयकारक अनुभवातून पुरता हलून गेलो होतो आणि एका दगडावर बसून त्यांच्या जळत्या चीतेकडे बघत बसून होतो. सर्वजण पांगले आणि अचनाक ज्यांच्या शोधामधे मी तिथे गेलो होतो तो एक नागासाधू तेथे आला. जळत्या चीतेमध्ये हात घालून निखारे हातावर घेऊन त्याचे भस्म सर्वांगास लावून बर्फ़ाच्छादित गंगा नदीत माने पर्यंत पाणी लागले हया अवस्थेत “जय बाबा विश्वनाथ” असा जय घोष करत बसून राहीला. मी एका अनुभवातून सावरत असतानाच हे चित्र पुरते भंडावुन सोडणारे होते. मी त्या नागासाधूकडे त्या समाधी अवस्थेत पहात राहीलो. पुस्तकामध्ये त्यांचे हे हैराण करणारे चमत्कारीक वागणे वाचले होते, यूट्यूबवर पाहीले होते. प्रत्यक्ष समोर जे घडत होते त्यावर विश्वास कसा ठेवावा उमगत नव्हते. श्रध्दा-अंध्रश्रध्दा, अनेक वर्षाचा सराव, हटयोग, सहनशिलता की शरीराला पराकोटीच्या वेदना देवून शरीर आणि मन मारुन टाकण्याचा प्रकार, की काय ? मला काहीच समजून घ्यायचे नव्हते. त्या वातवरणामधे स्वतःला समर्पित करण्याची भावना होती. मी वाट पहात राहिलो आणि साधारण अर्ध्या तासानंतर तो साधू पाण्याबहेर आला. मी त्याच्या पाठोपाठ चालू लागलो. त्याला ते समजलं. एऱ्हवी क्रोधित होऊन हातातील काठीने हानी पोहचवणारा साधू कदाचित माझ्या एकाग्रतेमुळे व संयमामुळे मला प्रतिसाथ देत होता. मी त्याच्या सोबत बोलू लागलो, त्याचे जीवन समजून घेऊ लागलो. इतकी भयानक आणि भिन्न प्रकारची जमात ह्या देशात अस्तित्वात आहे हे जाणून घेताना मी मुळापासून हलून गेलो होतो. (नागा साधूंच्या जीवनावर मी भाग-२ मधे सविस्तर लिहिणार आहे ). संभाषणाच्या दरम्यान त्या साधूने जन्मापासून दूध सोडून इतर कहीही ग्रहण केलेले नाही हे समजल्यावर मी विधात्याच्या ह्या निर्मितीस देखील मनोमन वंदन केले. तो साधू म्हटला, ” मैं पैदा हुआ तब मेरी माँ ने अपनी छाती का दूध पिलाया न की दाल-चावल। मतलब वह पूर्णांन्न बना के रखा था। तो फिर मैं और कुछ ग्रहण क्यूँ करूँ ?” मी फ़क्त ऐकत होतो. उमगत होतो. की जगण्यासाठी किती किमान गोष्टींची आवशकता असते आपल्याला. आणि आपण सुखाच्या, आनंदाच्या, हौसेच्या किती भिन्न परिभाषा आणि व्याख्या करुन बसलो आहोत. साधूसारखे जीवन जगता येणे शक्य नाही हे कबूल. पण साधूच्या जीवनाचे आकलन करुन घडोघडी पैदा होणाऱ्या असमाधानावर किमान मात तरी करू शकतो.

त्या चांगल्या मृत्यूच्या शोधात गंगा काठी आलेल्या सदगृहस्थाने आणि किमान साधनसामग्रीतून जीवन जगता येते हे त्या नाघासाधुचे जीवन स्मरून मी मुंबईच्या दिशेने “बनारसी आध्यात्म “ सोबत घेवून समाधान अत:करणाने प्रयाण केले.

..विनय खातू (०४.०१.२०१९)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s