“ संवाद “

माझ्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत. अत्यंत कमी शिकलेले, जवळ जवळ नाहीच म्हणा ना. पण त्यांचा लोकसंग्रह जबरदस्त आहे. पेशाने गायक असल्यामुळे त्यांचे सतत कार्यक्रम होत असतात. प्रत्येक कार्क्रमात ते सगळ्यांनाच पुढच्या कार्क्रमाचे निमंत्रण देतात.

काल अचानक त्यांचा फोन आला. “नये साल की मुबारक बातअसे ते पाचसहा वेळा म्हणून २०१८ वर्ष संपायला एक महिना बाकी आहे हे त्यांनी माझ्या लक्षात आणून दिले. मीही प्रसन्न मनाने त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसे ते एकदम भावुक होऊन मला म्हणाले, “हा सुद्धा एक पूजेचाच भाग आहे बरे का ! अध्यात्मिक जीवनात ह्याचे महत्व मोठे आहे.” मी एकत होतो. “असे बघा की आपल्याला आयुष्यात जी माणसे भेटतात आणि जी आपल्या जवळ येतात त्यांची नेमाने विचारपूस करण्याचे आपल्या कधी ध्यानीही नसते. एवढी प्रेमाची माणसे म्हणवायची आणि कित्येक महिने किंवा कित्येक वर्षे त्यांची खबरही नाही घ्यायची हे कुठल्या अध्यात्मात बसते ?”

त्यांचे विचार एकून मी थक्क झालो. ते पुढे म्हणाले, “अहो, नुसती चौकशी केली तरी माणसांना फार बरे वाटते. कित्येक माणसे फार एकटी असतात. त्यांना धड कोणी विचारणारे नसते. नुसते जेवलास का? एवढे विचारले तरी अशा लोकांना पुरते. मग तेवढेही आपण त्यांच्यासाठी करायचे नाही का ?

पूर्वी जेव्हा चाळ पद्धत होती तेव्हा लोक एकमेकांशी बोलायचे. एकमेकांच्या कुटुंबाशी भांडायचे आणि प्रेम ही करायचे. आता फ्लॅट सिस्टिमध्ये सगळेच फ्लॅट झालेत. लिफ्टमध्ये बोलायला सुद्धा मॅनर्स आडवे येतात. बोलणे तर सोडाच, एकमेकांकडे पाहून लोक हसतही नाहीत. माणसामाणसामधील संवाद तुटत चालेला आहे.

जे शेजाऱ्यांशी तेच आपल्या घाऱ्यातल्यांशी. प्रत्येकाच्या वेळा वेगळ्या. त्यामुळे जो तो आपल्यापुरता जगतो. संध्याकाळी सगळेच दमलेले असतात. मग कोण कोणाशी बोलणार ? कोण कोणाशी संवाद साधणार ? याची सर्वात मोठी झळ बसली आहे ती लहानग्या मुलांना. त्यांचे आईबाबा फक्त त्यांना दिसतात. त्यांच्याशी बोलायला, त्यांच्या विश्वात रममाण व्हायला पालकांना वेळ कुठे असतो?

लंडन मधील एक गोष्ट आहे. एका धनाढय माणसाने मरणानंतर आपली सगळी संपत्ती घरासमोरच्या बेकरीमधील केक आणि पाव विकणाऱ्या मुलीच्या नावे केली. आपल्या मृत्यूपत्रामध्ये त्याने लिहून ठेवले की, ” मी फार एकटा होतो. पण रोज सकाळी पाव आणायला मी बेकरीत गेलो की ती मुलगी माझे हसून स्वागत करायची. तिने गुड मॉर्निंग म्हटले कि मला वाटायचे खरोखरच माझी आजची सकाळ किती छान सुरु झाली. त्या आशेवर मी दिवस काढायचो. माझ्या जीवनात

प्रसन्न हास्य आणि आशा देणारी ही मुलगी मी कधीच विसरू शकणार नाही आणि म्हणून माझी धनदौलत मी तिला देऊन जात आहे. माझ्यासारखेच तिने इतरांचे जीवनही प्रसन्न करावे. ”

या गोष्टीवरून एवढे तात्पर्य सहज निघते की माझ्या ओळखीच्या त्या बिनशिकलेल्या गृहस्थांनी बोलता बोलता सांगितलेले जीवनाचे मर्म होते. त्यांनी हा विषय अध्यात्माशी जोडला आणि मला विचार करायला भाग पाडले. खरोखरच माणसामाणसांशी संवाद साधण्याचा हाही एक सुंदर आध्यत्मिक विचार आहे.

..विनयकुमार खातू (१८.११.१८)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s