” माझ्या शहराची एक भाषा “

एकविसाव्या मजल्यावरच्या खिडकीवर टकटक झाल्याने मी दचकून पाहिलं. मला काचेपलीकडे मुंडास बांधलेलं डोकं दिसलं. त्याने खुणेने पाणी मागितलं. मी पाण्याची बाटली आणली आणि त्याला देण्याकरता वाकलो. वाकल्यामुळे मला एकदम तो ज्या उंचीवर काम करत होता त्या उंचीची जाणीव झाली. बांबूच्या पंचवीस मजली परातीवर तो काम करत होता.

प्रथम बाहेरच्या प्रखर सूर्यप्रकाशात मला त्याचा चेहरा नीट दिसला नव्हता. तो पाणी पीत असताना मी त्याच्याकडे निरखून पाहीलं. तो सुमारे पंचविशाचा असेल. त्याची चहरेपट्टी जराशी बसकी होती. पण जीवावरचं काम करणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यात, विशेषतः नजरेत, एक चमक असते, सावधानता असते तशी त्याच्या नजरेत होती. त्याने तोल गेला तर सवारण्यासाठी म्हणून, हूक असलेला एक पट्टा घेतला होता. पण त्याचा तोल गेला असता, तर त्या पट्याचा किती उपयोग झाला असता हे मला सांगता येईना. त्याच्या सावधानतेवर बेफिकिरीची एक हलकी झोकदार रेषा निश्चित होती.

वेगवेगळ्या उंचीवर काम करणाऱ्या कामगारांच्या एकमेकांशी बोलण्याचे किंवा ओरडण्याचे आवाज मला उघड्या खिडकीतून ऐकू येऊ लागले. हिंदी, बंगाली, बिहारी, कानडी ह्या भाषांतले शब्द कानावर येऊ लागले. त्या सर्वाच्यात एक समाईक भाषा होती. ती म्हणजे ते सराईतपणे करत असलेल्या कामाची भाषा. त्या भाषेत, व्यवहार चालण्याइतपत, इतर मेटालँग्वेजेसचा उपयोग होत होता. कामाच्या सरावातल्या संदर्भामुळे त्यांच्या मातृभाषांचा अर्थही एकमेकांना सहज कळत होता.

मी जरा आणखी वाकून त्या रंगारयाकडे बघू लागलो. ते इमारतीला अंड्यासारखा पांढरा रंग देत होते. परातिच्या बाबूंचा रंग पिवळ्याकडे झुकणारा पांढुरका होता. त्यावर वेगवेगळ्या अंतरावर लोंबकळणारे हे देह बहुतेक मळक्या पांढऱ्या कपड्यातले होते. क्वचित एखादा तरुण निळ्या जीन्समधे होता. पण त्या साऱ्यावर, ते इमारतीला देत असणारा पांढरा रंग, वेगवेगळ्या आकारांत सांडलेला होता. त्यांचे रापलेले देह वरखालच्या पायऱ्यांवर होते. वेगवेगळ्या उंचीवर असल्याने, त्यांच्या शरीरांचे आकार कमी कमी होत, किटकाइतके लहान दिसत होते. त्यांच्या शरीरावर जास्तीच मांस नव्हतं. दिसत होते फक्त बांबूसारखे काटक अवयव.

समोरचा पश्चिम मुंबईचा प्रभादेवीपासून हाजी अलीपर्यंतचा परिसर दिसत होता. काही शिल्लक बंद पडलेल्या गिरण्या दिसत होत्या. फ्लायओवरुन बसेस,कार्स धावत होत्या. पलीकडे रेल्वे दिसत होती. त्या पलीकडे सी लिंकचा छोटासा भाग दिसत होता. त्यावर गाड्या मुंग्यांसारख्या भराभर चालल्या होत्या. नवीन नवीन इमरतींच बांधकाम चालू होतं. रस्ते खोदले जात होते. परत खोदण्याची सोय करण्याकरता, अधूनमधून भरलेही जात होते. परळच्या परिसारतले सरावाचे अनंत व्यवहार चालू होते.

परातींवरच्या कामगारांना दिसत होतं फक्त डोळ्यासमोरच काम. त्यांना त्या कामाची भाषा उत्तम येत होती. शहराच्या सीमेंट आणि लोखंडाच्या सांगाडयाची रचनाच मुळी ह्या भाषेच्या व्याकरणावर आधारित होती. त्याचे वैयाकरण, पन्नास पन्नास मजल्यांच्या परातीवर चढून, ह्या उच्च व्याकरणाचे नियम घडवत होते. शरीराच्या लयबद्ध हालचालिंतून श्रमाच्या भाषेचे छंद रचत होते.

त्यांचे छंद हे मुक्तछंद नव्हते. त्यात अक्षरांना मात्रागणवृतांइतकीही मागेपुढे होण्याची मुभा नव्हती. ते अक्षरगणवृतांइतके बांधिव होते. त्यातल्या प्रत्येक गणातील हलचलिची एक मात्राही मागेपुढे झाली, तर तोल जाऊन त्यांचा मृत्यू ओढवण्याची शक्यता होती. एकाकडून दुसऱ्याकडे जाणारी हत्यारं, काम संपवून आपली जागा पुढच्या कामकारयाला देण्याच्या मात्रा, डोळ्यांवर येणाऱ्या उन्हाच्या तिरपी चुकवण्याने छंदाला अचानक छेद देणाऱ्या हलचाली, उन्हात तळपणारी घामाने भिजलेली, रापलेली शरीरं, भव्य इमरतींच्या वीटा जोडत होती. कॉन्क्रीट ओतत होती. लोखंडाच्या सळ्या आणि लाकडं कापत होती. रंधा मारत होती. पाइप लावत होती. विजेच्या तारा तोडत होती. क्रेन्स चालवत होती. ह्या श्रमजीवींचे श्वासही प्रबंध होऊन त्यांतून शहरी जीवनाला महाकाय इमरतींच्या रूपाने आधार देत होते. मग त्यांच्या तात्पुरत्या झोपड्या उठवून ते दुसऱ्या विराट शहराची रचना करायला, तीच भाषा घेऊन जाणार होते..

..विनयकुमार खातू (१२.११.१८)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s