” पारसिकचा डोंगर “

ठाण्यात नुसती इंडस्ट्री आहे असे नाही. ठाण्यात डोंगरही आहेत.एकाआड एक डोंगर आहेत. एक छानसा तलावही आहेपारसिकच्या डोंगरात.

आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या पिछाडीला पारसिकचा डोंगर आहे. नव्हे डोंगराची मालिका आहे. तिथे म्हणे १९३५ ते १९६० मध्ये घनदाट अरण्य होते. वाघ,सिंह, हरणे असे प्राणी होते. झाडी एवढी दाट होती की दिवसाढवळ्या सुद्धा जंगलात एकटे जायची भीती वाटायची म्हणे. म्हणे म्हणायचे कारण असे, की आता तो डोंगर वनश्रीने आच्छादित नाही. उघडा, बोडका, विरागी दिसणारा पारसिक डोंगर आणि नाथ संप्रदायातल्या सारखे दिसणारे त्याचे निःसंग साथी.

दगडातून, खळग्यातून डळमळत डळमळत, वळणे घेत डोंगराच्या पायथ्याला विळखा घालणाऱ्या अक्राळविक्राळ झोपडपट्टी कडे पाहून उदास हसत आमची गाडी एका मध्यमवयीन वडाखाली येऊन थांबली. त्या ठिकाणी फारशी झाडी नसल्याने उन्हाच्या झळा अंग पोळत होत्या. काही स्वयंसेवीसंस्थांनी आणि जिल्हयातल्या बँकांनी लावलेली झाडेही अर्धी मरून गेलेली. उरलेली अर्धी पानगळीत विदीर्ण झालेली. खालून वर डोंगरावर चढणारी राक्षसी झोपडपट्टी या उरलेल्या बापड्या झाडांची शिकार करण्यासाठी टपलेली.

दूरवर दिसणारे तळे, हिरव्यागार शेवाळ्यात लपेटून पडलेले. डोंगरमाथ्यावर थोडी थोडी वयात येणारी झाडे बस ! एवढेच वर्णन पारसिक डोंगराचे.

मी काहीवेळ तिथे शांत बसून रहायचं ठरवून एका झाडाखाली बसून राहिलो . अचानक डोंगर बोलतोय असे वाटायला लागले. पायवाटे वरचा पाचोळा गाडीच्या गतीने उगाच उसळला आणि पुन्हा निपचित पडला. रस्ताभर काळे कातळ हिरव्या वस्त्राचे दान मागत उभे होते. पायथ्याला दगडांची खाण असल्याने कंत्राटदारांनी बराचसा दगड ओरबाडून नेला आहे, हे बघून मला मनात हुंदका दाटून आला.

डोंगर संपता संपताच झोपडपट्टीचे ओंगळ दर्शन झाले. प्लास्टिकच्या पिशव्या हवेत तरंगत होत्या, डुकरे आणि मुले घाणीत बागड होती. मुले ठिकठिकाणी शौचाला बसलेली होती.

मला त्या झोपड्पट्टीवासियांचे दुःख कळत होते , पण त्यांनी पारसिक डोंगराचे सौभाग्य हिरावून घेऊ नये असेही वाटत होते. पोटापाण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातुन आलेली माणसे. अगतिक होती म्हणून इथे वसणारी,इथली झाडे निर्दयपणे तोडणारी आणि डोंगराच्या छाताडावर घर करून राहू पाहणारी.

त्या डोंगराचेही स्वतःचे दुःख आहे. त्याचे उद्ध्वस्त झालेले अस्तित्व मला अस्वथ करत होते. माणसे बोलतात तसा तो डोंगर त्याच्या पत्थराच्या भाषेत बोलत होता. त्याचे लेकुरवाळेपण कसे नष्ट झाले याची कहाणी सांगत, उन्हात उभे राहून पानाची आसवे गाळत.

माझी झाडं परत दे ,माझं जंगल परत दे“, म्हणत होता !!

..विनयकुमार खातू (.१२.१८)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s