” थेंबभर शिल्लक “

तूच ना सांगायचास मला

हसून वेदना वागवायला?

तूच ना म्हणायचास

सोसून यातना,

शिक,दोन थेंब शिल्लक रहायला !

माझ्याच कवितेच्या या ओळी आठवल्या आणि पाठोपाठ समोर आले अशा व्यक्तींचे चेहरे ज्यांनी आयुष्यात खूप काही सोसले आहे आणि तरीही स्वतःला थेंबभर का होईना शिल्लक ठेवले आहे.

पहिली आठवली ती माझी डान्सर मैत्रीण. तरुण वयात परजातीच्या एका तरुणाच्या प्रेमात पडली,लग्न केले.

नृत्याच्या कार्यक्रमाच्या निमित्याने तिच्यासोबत राहून त्याच्या देशी परदेशी ओळखी झाल्या.त्यातील एका बाईच्या प्रेमात पडून एक दिवस हा माणूस कोणालाही सांगता परगंदा झाला.

त्याचा शोध घ्यायला तिला कित्येक महिने लागले तोपर्यत तो परदेशी स्थायिक झाला होता. ही कटु बातमी तिला समजली त्यावेळेला तिचा एक नृत्याचा प्रयोग चालू होता.प्रयोगाच्या दरम्यानच ती स्टेजवर कोसळली. गर्भाशयाच्या कॅन्सरचे निदान झाले.

प्रेमविवाह केला असल्याने सासरमाहेर तिला कोणीच नव्हते. दीड वर्षे ही मुलगी हॉस्पिटल आणि घर अशा वाऱ्या एकटीच करीत होती. पूर्ण खचलेली,पण जिद्दीने पुन्हा ती उभी राहिली. कॅन्सरवरही तिने मात केली. तिच्याकडे बघितले की मला थेंबभर शिल्लक राहणे आठवते.

दुसरी गोष्ट अशाच एका परिचिताची अपघातामध्ये दोन्ही हात आणि पाय मोडले दोन वर्षे हा माणूस अंथरुणाला खिळलेला होता. सर्वस्वी परावलंबी. येणारे जाणारे त्याला उमेद तर दयायचे नाहीतच पण त्याचा भविष्यकाळ कसा अंध:कारमय आहे हेच त्याला सुचवून जायचे. तरीही हा माणूस धीराने सगळ्या वेदना सोसत राहिला.

आपल्यातले बरेचसे लोक संकटांनी खचून जातात एवढे, की पुन्हा उभेच राहू शकत नाहीस. आयुष्यात उमेद गेली की उरलेले जीवन शुष्क,निरस होऊन जाते. पण जे संकटे पचवूनही थेंबभर शिल्लक राहतात त्यांनीच जगाला जगण्याची उमेद दिली आहे.

क्रीडा क्षेत्रातील कितीतरी खेळाडू जीवावरच्या दुखण्यावर मात करून, मोडलेल्या हातापायांना पुन्हा सावरून ऑलम्पिक सारख्या स्पर्धा मधून भाग घेतात. सुवर्ण पदके जिकतात आणि आपली कथा जगाला सांगायला पुन्हा शिल्लक राहतात.

बहुसंख्य लोकांना अडीअडचणीचे, आव्हानाचे, संकटाचेच आयुष्य मिळते. अगदी रोजचा दिवस म्हणजे सुद्धा त्यांच्यासाठी छोटेसे युद्धच असते. अगदी मूठभर माणसे अशी असतात त्यांना रोजच्या रोज संकटाचा सामना करावा लागत नाही. त्याचा अपवाद सोडला तर आपण सारेच परिस्थितीशी दोन हात करीत असतो. ज्या क्षणी आपल्याला मैदान सोडून जावेसे वाटते ,आपण हरलो असे वाटते तोच क्षण आपण जिंकायचा असतो त्या क्षणाच्या पुढचा क्षण आपल्याला विजय मिळवून देणारा असतो दुर्दैवाने आपल्यातील बहुसंख्य लोक त्या एका अगतिक क्षणात पराजय पत्करून माघारी जातात.एकदा आपणही प्रयत्न करुन बघूया की असा हळवा क्षण आपण जिंकू शकतो का?

बरेचदा आपल्या वेदना आपल्या विचारातून निर्माण होतात. बॉक्सिंग या खेळामध्ये एक मजेदार गोष्ट आहे. बॉक्सिंग करताना जो बॉक्सर पडतो तो पराभूत होत नाही. पडल्यानंतर दहा अंक मोजेपर्यत जर तो उठू शकला नाही तरच त्याला पराजित घोषित केले जाते. आपणही तेव्हाच पराभूत होतो जेव्हा आपण पराजय स्वीकारतो. गरज असते ती फक्त आपल्या इच्छाशिक्तीची.

Pain Barrier नावाची एक संकल्पना सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांनी पुढे आणली आहे. याचा अर्थ असा की आयुष्यातील संकटे दूर करण्यासाठी सकारात्मक विचार करावेत. त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते. याविरुद्ध जर आपण नकारात्मक विचारांना प्रबळ होऊ दिले तर संकटातून मार्ग शोधायचे त्राणही आपल्यामध्ये उरत नाही. ज्या क्षणाला आपल्याला वाटते की बस्स ! या पूढे आपण सहन करू शकणार नाही आणि आपण पराजय पत्करतो त्याला Pain Barrier म्हणतात.

ज्या क्षणी आपल्याला वाटते की आपण आता हरलो तेव्हा शांत बसून आपल्या सगळ्या संकटाचा,वेदनांचा एक आराखडा तयार करावा. त्यातल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर काय असेल हे त्याच्यापुढे लिहीत जावे. कित्येकदा असे होते की प्रश्न सोडविण्याचे मार्ग सोपे असतात. आलेल्या संकटांनी आपण एवढे गांगरून गेलेले असतो की आपल्यासमोरचे आपल्याला दिसत नाही. म्हणून केव्हातरी स्वतःपाशी बसावे ,शांतपणे आपल्या आयुष्याचा लेखाजोखा मांडावा आणि गणिते सोडवतो तसा एक एक प्रश्न सोडवित जावे.

इंग्लिशमध्ये एक सुंदर विचार आहे त्याचा अर्थ असा आहे जगातील प्रत्येक दुःखावर एक उतारा आहे तो शोधायचा प्रयत्न करा. मिळाला तर उत्तम, नाहीतर त्या दुःखाचा विचार करणे सोडून द्या.

उमेद देणारी अनेक माणसे आपल्या अवती भवती आहेत. त्यांना निरखून पाहण्याचा त्यांच्याकडून ऊर्जा घ्यायचा निश्यय आपल्यातील प्रत्येकाने केला तर आपणही सर्व संकटासकट अडचणीसह आनंदाने जगू शकू असा मला विश्वास वाटतो..

..विनयकुमार खातू (२०.११.१८)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s