” अफ्रिकन सव्हाना जंगल “

महाराष्ट्रातील बरीच जंगले पाहिली. त्यांच्या सहवासात ती थोडी थोडी वाचायला शिकलो. एकदा केनियाला जाण्याचा योग आला. केनिया आणि दक्षिण अफ्रीका.

विमान नैरोबीशी जवळीक सांगायला लागले तेव्हा शुभ्रधवल मेघांचे तांडे आकाशभर पसरले होते. अनंत निळ्याशार रंगाचे, गहिरे. मुंबईतल्यासारखे पांढुरके, रेशनमधे वाटून दिल्यासारखे, मापाइतकेच बेतून दिलेले नाही, खिडकीच्या गजातून डोळ्यात मावेल एव्हडेच !

हे आकाश इतके प्रशस्त होते की त्यात बागडायचा मोह व्हावा. जुन्या घरातलल्या अंगणासारखे ऐसपैस. वरून पाहीले तर धरती किती मोकळी वाटत होती. मैलोन मैल घरे नाहीत, माणसे नाहीत, गर्दी, आवाज़, घुसमटकाही नाही. फक्त धरतीचा लफ्फेदार हिरवा शालू , हा असा अंगभर ल्यालेला ! ठाई ठाई पाण्याचे साठे, दरया , डोंगर, झाडेमाणसे सोडून सगळे काही.

मी स्तिमित होऊन पाहत राहिलो. शहर जवळ आले तसे पुन्हा एकदा खाली पाहिले. घरे, घरांना लागून झाडांच्या वस्त्या. झाडांना लागून पुन्हा वस्त्या. झाडांना लागून पुन्हा घरे, पुन्हा झाडे, पुन्हा घरे. अंगणात जंगल, जंगलात अंगण.

नैरोबी राष्ट्रीय उद्यान शहराच्या वस्तीला अगदी लागून आहे. त्यात बरेच प्राणी आहेत. प्राण्यांना माणसे माणसाना प्राणी, दोघांना एकमेक दिसत राहतात. जंगलातूनच शहराचे लाइट्स दिसतात. दोहोंमधे विस्तीर्ण पठार आहे.

प्राण्यांजवळ रहायची संकल्पना अजब वाटली. मुंबईलाही संजय गांधी उद्यानाचा सहवास आहे, पण तेथे अशा प्रकारचे सहजीवन नाही. इथे माणसांनी प्राण्यांच्या घरावर म्हणजे जंगलवार सातत्याने आक्रमण केल्याचे दिसते. ऐवढे असूनही जंगली प्राणी, विशेषतह: बिबटेच माणसांना त्यांच्या वस्तीत येऊन मारतात असा कांगावा सारखा चालू असतो.

मसई मारलागेलो. तिथे आपल्यासारखे जंगल नाही, वनश्री नाही. तिथे आहेत विस्तीर्ण पठारे, गवताची जंगले. मधेच एकटेदुकटे झाड. पठाराना चारी बाजूनी डोंगरांची महिरप. मधे मुक्त विहार करणारे प्राणी. आपल्या मर्जीने जगणारे. माणसांना घाबरणारे.

हरणांच्या जाती जगभर बुजऱ्याच. माणसांची चाहूल लागली तरी चौखूर उधळणारया, गव्यांचे थवे, जिराफांची कुटुंबे, सिंहाची खानदाने, शहामृगांचे परिवार, गेंड्यांची मुलेबाळे. कांचनमृग डोळ्याचे पारणे फेडणारे.

नाना तऱ्हेचे पक्षी. तिथली गिधाडेसुद्धा सुंदर वाटली. तिथल्या गवताची सोनेरी सोनेरी पाती. गव्हाळ रंगाची, शेलटया अंगाची, वयात आलेली. मुरुकत हसणारी, सतत डोलणारी. त्या गवतात बागडणारया हारणांच्या मादया. पिल्लांना चाटत बसलेल्या, कोणी त्यांचा जणू गृहपाठ घेणाऱ्या. जंगलात राहायचे म्हणजे जगायची कला नको का शिकून घ्यायला ? मग हत्तिण असो की सिहींण. साऱ्या आया इथूनतिथून सारख्याच. या सुंदर जगात वावरताना, असे वाटले की खरेच का बनल्या भाषा ? रंगद्वेष ? आणि हो माणसे ! का बनली माणसे ?

तिथे कुरूपता नव्हती. अगदीवाइल्ड बीस्टम्हणवणारी मस्तवाल, फ्रेंच दाढी ठेवणारी माणसे. जेवढी काळी माणसे भेटली, सगळे तुकतुकीत, धष्टपुष्ट आणि शरीरसौष्टव असलेली.

सव्हाना म्हणजे गवताचे पठार, झाडांच्या सोबतीने जगणारे. उघड़ा माळ. तिथल्या रहिवाशांचे सर्व जीवन खुले, पारदर्शक. दडवण्यासारखे त्यांच्याजवळ काहीच नाही. सव्हानामधे प्रॉपर्टीवरुन कोणाचे मुड़दे पडत नाहीत. कोणी बेघर नाही. सगळे आकाशाच्या छपराखाली गुणयागोविंदाने राहतात. कोणी कसला संचय करत नाही, कोणाचे पाश कोणात गुंतलेले नाहीत. आजपुरते, अगदी त्या क्षणापुरते जगायचे. आनंदाने, उत्साहाने. तेथील प्राणीमात्रांचे सर्व गुण माणसांमधे अपसूक मिसळले आहेत.

पुढच्या क्षणी एखादा चित्ता एखाद्या हरणाची शिकार करेल. एखादे गोंडस पिल्लू जीवनिशी जाईल, पण त्याची फिकिर कोणालाच नाही. निसर्गाच्याबळी तो कान पिळीया कायद्यानुसार प्रत्येक जण जगत राहतो. पोटापुरती शिकार करतो. माणसांसारखे त्यांच्यात गट नाहीत, सुडाची भावना नाही, वैर नाही.

तिथे एक फिल्म पहिली. सिंहाची मादी तिच्या लेकरांसाठी जंगलात शिकारीला गेलेली असते. परत येऊन पाहते तो तिच्या पिल्लाला तरसांनी मारलेले. तिला पाहून तरस पळून जाऊन दगडामागे लपतात. सिंहिण आपल्या बाळाला पोटाशी धरुन काही काळ विलाप करते. काही क्षणांनंतर ती शांतपणे त्याचे शव ओलांडून निघून जाते. ती जाताच तरस येऊन त्या मृत बाळाचा फडशा पाडतात.

शेकडो प्राण्यांचे हे निवास्थान पण सारेच अनिकेत. जीवन देणारे, जीवन घेणारे जंगल आणि त्यांचे दैनंदिन जीवन चालवणारे तिथले नैसर्गिक कायदे.

अफ्रीकन सव्हानाचे शौष्ठव डोळ्यासमोरून हालत नाही आणि तिथे शिकलेले जीवनाचे धडे विसरु म्हटले तरी विसरता येत नाही.

परतीच्या प्रवासात मी माणसाच्या मनातल्या जंगलाचा विचार करत राहिलो. भर दिवसा किर्र अंधार असलेली. सूर्याची किरणे पोचतच नाहीत या मनाच्या धरतीवरअशी निबिड अरण्ये असलेली आपली मने. पशुपेक्षाही क्रूर आणि हिंस्र. खऱ्या जंगलाचाही स्वतःचा एक कायदा असतो, पण आपल्या जंगलाचा ?

हम करे सो कायदा !

..विनयकुमार खातू (२३.१०.१८)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s