“ तो “ कोण आहे ?

‘ आज पुन्हा त्यांनी बाहेर ठेवलेली बादली पळवली. आता हाताला मिळूदेचं, त्याची तंगडी मोडून ठेवते,’ आशाताई वैतागत म्हणाली.

गेल्या पंधरा दिवसात दुसऱ्यांदा तिची बाहेर ठेवलेली प्लास्टिकची बादली गायब झाली होती. आज आशाताई इतकी चिडली होती की तिची बादली चोरणारा तिला सापडला असता तर त्याला तिने झोडपूनच काढले असते.

अहो, दोन दिवसापूर्वी आमची बादलीपण गायब झाली,’ रस्त्यावरून जाणारी तिची शेजारीण म्हणाली.

त्या दोघी बोलत असताना समोरच्या बिल्डिंगमधे घरकाम करणारी मनीषा तिथे पोचली. ‘ या बिल्डिंगच्या तळमजल्यावर कामत राहतात ना, त्यांच्या खिडकीतून सातआठ वर्षांचा मुलगा तांब्या पळवत होता. कामतबाईनी बघितलं आणि त्या ओरडल्या. त्या बाहेर येई पर्यंत तो पसार झाला,’ मनीषाने सांगितले.

आमचे हेपण म्हणत होते की भंगार गोळा करत फिरणारी मुलं या चोऱ्या करतात,’ आशाताई म्हणाली. त्या सर्वानी मिळून त्या पोरांवर पाळत ठेऊन पकडायचं आणि त्यांना चांगला चोप द्यायचा ठरवलं.

दोन दिवस गेले. आशाताई दुपारी खुर्चीत बसून राहिली आणि बादली राखण्यासाठी बाहेरचे दार उघडे ठेवून त्या अलीकडे सोफ्यावर बसून राही.

ती अशी बसली असताना बाहेर काही तरी आदळल्याचा आवाज आला. ती लगबगीने उठून बाहेर गेली. सहासात वर्षांचा घाणेरड्या कपड्यातला सावळासा मुलगा त्याची बादली उचलून आणखी काही मिळते का शोधत होता. आशाताईला पाहताच तो गडबडला. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला; पण त्याने पाठीवर घेतलेल्या जड गोणपाटामुळे त्याला जलद पळणे शक्य झाले नाही. आशाताईने झडप घालून त्याला पकडला आणि त्याच्या मुस्काटात दिली. ती मोठमोठ्याने त्याच्यावर खेकसू लागली तिच्या आवाजामुळे शेजारीपाजारी गोळा झाले.

कोणी त्याची गोणपाटाची पिशवी काढून घेतली, कोणी त्याला चापट्या मारल्या, कोणी त्याला शिव्या घातल्या, बिथरून गेलेला तो पोरगागलती हुई, माफ कर दोअसे हात जोडून म्हणत होता; पण प्रत्येक जण संतापला होता. शेवटी त्यांनी त्याला पोलिसात द्यायचे ठरवले.

पोलिस स्टेशनवर हवालदाराने त्याचा कानफाटात मारली आणिआम्ही याच्या आईबापाला बोलावून केस करतोअसे सांगून सर्वांना परत पाठवले.

पोलिसांनी त्याच्या आईबापाला निरोप धाडला पण निरोप मिळायला आईबाप झोपडीत हवेत ना, बाप कर्णाक बंदरावर रोजंदारीच्या कामासाठी जाई तर आई घरकामासाठी. दोघेही घरी परतायला संध्याकाळचे सात वाजत. याचे नाव लखन. लखनला आणखी चार भावंडे. तीही लखनसारखी भंगार गोळा करत.

लखनचा दिवस भल्या पहाटे सुरु होतो. बाहेर काळोख असतानाच बाप त्यांना उठवतो. इतर पोचण्यापूर्वी कचरा फेकतात तिथे पोचले तर जास्त भंगार मिळण्याची शक्यता. शिवाय पहाटेच्या वेळी हाकलून द्यायला कोणी नसते. पहाटेला गाईकुत्रीदेखील कमी असतात. डोळे चोळत, तोंड धुता लखन बाहेर पडतो.

सुरवातीला कचऱ्याच्या दुर्गंधीने ओकारी येई; पण हळूहळू त्याला सवय झाली आणि काही वाटेनासे झाले. उलट आपल्याला जास्त भंगार मिळेल म्हणून तो आता कचऱ्यावर तुटून पडतो. प्लॅस्टिकच्या बाटल्या, चपला, बादल्या, लोखंडाच्या वस्तू तो शोधतो. या शोधात त्याला कधी कधी चांगल्या वस्तू देखील मिळतात. कधी कधी एखादी खमंग खाण्याची चीजदेखील मिळते. त्याच्यासारखेच कचरा चुननेवाले त्याचे मित्र आहेत. कचराकुंडीवरतीच त्यांची मैत्री झाली आहे.

आठ वाजेपर्यंत गोळा केलेले भंगार पाठीवरच्या गोणपाटात भरून ते भंगारअड्यावर पोचतात. तिथे अड्डेवाल्याचा माणूस त्यांच्याकडच्या वस्तूंचे वजन करून घेतो. भंगार अड्डेवालाच त्यांना नाश्ता देतो. त्याच्यासाठी ही मुले म्हणजे एम्प्लॉयी. तीच त्याच्यासाठी भंगार गोळा करण्याचे मोठे काम करतात. शिवाय मोठया माणसांसारखी घासाघीस नाही. जितके मोजले, जितके पैसे दिले तितके निमूटपणे मान्य करतात. दरिद्री आईबाप पहाटे उपाशीपोटी हाकलवत असलेल्या पोरांना अड्डेवाल्याचा नाश्ता म्हणजे मोठी पर्वणी. तिथे नाश्ता झाला, पैसे घेतले की ही मुले खेळायला मोकळी. खेळ म्हणजे एकमेकांच्या खोडया काढणे, एकमेकांची पाठ पकडणे, कचऱ्यात सापडलेली मोडकीतोडकी खेळणी घेऊन खेळणे आणि पुन्हा भंगार शोधायला जाणे.

लखनच्या मनगट आणि डाव्या हातावर फडके बांधलेले होते. पोलिसाने जेव्हा त्याचा डावा हात धरून त्याला ओढले तेव्हा लखन असह्य वेदनेने कळवळला.

काय झालं ओरडायला ?’ पोलीस खेकसला.

घाव है ‘, म्हणत त्याने हातावर बांधलेले फडके बाजूला सारले. त्याच्या हातावर बघणारयाला शिसारी येईल अशी चिघळलेली जखम होती.

पंधरा दिवसांपूर्वी लखनला कुत्रा चावून जखम झाली होती. ती त्याने नुसतीच फडक्याने बांधली होती. दिवसभर तो कचराकुंडीच्या घाणीत असल्यामुळे जखमेत जंतूंचा प्रादुर्भाव झाला होता. सात वाजता घरी परतणाऱ्या आईबापाला झोपडीच्या अंधारात ती जखम कधी दिसलीच नव्हती आणि दिवसभभराच्या पायपिटीन थकणाऱ्या लखनने झोपेच्या ग्लानीत त्यांना कधी सांगितलेही नव्हते. त्या जखमेच्या वासाने पोलिसाला मळमळले. त्याच्याही मनाला वाईट वाटले. तो त्याला सरकारी दवाखान्यात घेऊन गेला. त्याला येणाऱ्या दुर्गंधीने डॉक्टर वैतागला. नर्सदेखील खेकसली. वॉर्डबॉयने तोंडावर मास्क चढवून जखम साफ केली. साफ करताना लखनला असह्य दुखले. तो किंचाळला. वॉर्डबॉयने त्याच्या एक मुस्काटीत दिली.

ड्रेसिंग झाल्यावर पोलिसाने त्याला पुन्हा चोरी करण्याची तंबी देऊन पिटाळून लावले.

लखन धावतच आपल्या झोपडीत आला. झोपडीत अजून कोणीच परतले नव्हते. तो खूप थकला होता. आज झालेल्या मारहाणीमुळे त्याचे अंग दुखत होते. पडल्या पडल्या तो झोपी गेला. रात्री जेवायलाही उठला नाही. पहाटे मात्र आईने त्याला हलवून उठवले आणि तो नेहमीप्रमाणे डोळे चोळत कचराकुंडीच्या दिशेने चालू लागला.

कोण आहे लखन ? चोरटा ? स्कुल ड्रॉप आऊट ? वाया गेलला मुलगा ?

तोआहेबालकामगार ‘ ! वस्तूंच्या रिसायकलिंगच्या धंद्यात श्रमणारा बालकामगार आहे ; पण तो बालकामगार असल्याचे कोणालाच दिसत नाही. त्यामुळे त्याच्या पुनर्वसनाचा विचार कोणाच्या डोक्यात येत नाही. जेव्हा त्याच्या वायाची मुलंभारत माझा देश आहेअसे अभिमानाने म्हणत असतात तेव्हा तोया देशात माझ्या बापाचं काहीच नाहीएहे अनुभवत आहे.

फ्लायओव्हवर खाली, बसस्टॉप, रेल्वे स्टेशन, सिग्नल इथे असे दिसणारे लखन आणि त्यांच्या भविष्याचं काय ह्या प्रश्नाचे सोयीस्कर उत्तर ज्याचे त्याचे नशीब असेल तर ते मला अस्वस्थ करते

..विनयकुमार खातू (११.१०.१८)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s