मला गवसलेले ” गांधी “

महात्मा गांधी एक विश्वव्यापी व्यक्तिमत. मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला ह्यांना ते भावले. २००० साली ‘मिलेनियम’ वर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमधे लेखक, नेते, शास्त्रज्ञ,कलावंत यांना मागे टाकत आईन्स्टाईन आणि गांधीजी ही दोन नावं उरली. त्यात आईन्स्टाईन ला जास्त मत पडली. तोच आईन्स्टाईन एकदा म्हटला होता, ” गांधींसारखी व्यक्ती कधी काळी जन्मली होती आणि ह्या भूतलावर चालली होती, हे पुढच्या पिढीला पटणार नाही.” भारतामध्ये तर ‘गांधीझम’ चे अभ्यासक आणि गांधीवादी अनेक विचारक आहेत. ज्यांच्या विचाराने भारावून जावे असे हे व्यक्तिमत्व. मला गांधींमधील सर्वात भावणारा गुण म्हणजे त्यांचा कमालीचा साधेपणा. तो त्यांच्या पेहरावापेक्षा वागण्या बोलण्यात जास्त होता.

गांधी सिनेमात एक दुश्य आहे. नेहरू,पटेल व इतर नेते आदी मंडळींची महत्वाच्या विषयावर गांधीजी सोबत मिटिंग चालू असते. गांधीजी एकदम उठतात. सगळे आश्चर्याने पाहू लागतात. गांधीजी म्हणतात , “माझ्या बकरीकडे बघायची वेळ झाली ” सगळ्यांच्या चेहऱ्यावर वैताग, काय हे खुळं असा भाव. मला हा प्रसंग फार ठसला. देशाचा कारभार करणं हा जसा जीवनाचा भाग आहे , तसा बकरीला चारा घालणं हाही. तिचा दुखावलेला पाय बांधणही.

दुसरा एक प्रसंग गांधींवरील एका डॉक्युमेंटरीतला. गांधीजी दिल्लीतील व्हॉईसरॉय हाऊसवर बोलणी करायला गेलेले. बोलणी संपवून रात्री उशिरा घरी परत निघताना ते ‘हरिजन वस्ती ‘ मध्ये उतरलेले. व्हॉइसरॉयनी दिलेली गाडी नाकारून शांतपणे मोकळा रस्ता चालताना ते दिसतात. इकडे त्या बोलण्यातून काय निष्पन्न झालं, याविषयी त्यांचे सहकारी, पत्रकार थांबलेले; पण गांधीजी काही मैल एकटे चालत गेले. ते त्या चळवळीच्या गतीच्या वावटळीत कधी भिरभिरले नाहीत, कधी उठून गेले नाहीत. ते आपल्या गतीने चालत राहिले. ते असामान्य असले तरी त्यांनी आपल्यातलं सामान्यत्व जपलं.

आजकालच्या राजकारणी, समाजकारणींची शोबाजी , जाहिरातबाजी आणि त्याहून सेंटर ऑफ अट्रॅक्शन राहण्याची धडपड करताना बरेच दिसतात. ते पाहिल्यावर गांधीजींच्या एका गोष्टीच मला प्रचंड आश्चर्य आणि कुतूहल वाटत. इतक्या वर्षाच्या अविश्रांत लढ्यानंतर, अनेकदा भोगलेल्या तुरुंगवासानंतर आपणास स्वराज्य मिळालं. अशा कार्यक्रमाचे सर्वमान्य नायक गांधींना म्हटल जात होत. पण त्यांना नोआखालील उसळलेल्या दंगली शांत करण्याच काम महत्वाचं वाटलं. आणि त्या सोनेरी क्षणाकड त्यांनी पाठ फिरवली. दंगलीचे डोंब उसळलेले असताना, सर्वत्र रक्ताची कारंजी उडत असताना गांधीजी एकटेच असे की जे तिथं जाऊ शकले आणि त्यांच आतलं बळी असं, की त्यांच्या अस्तित्वान दोन- तीन दिवसात दंगल शांत झाली . ज्या वेळी त्यांचे शिष्य आणि सर्व नेते स्वराज्यातल पाहिलं झेंडा वंदन करीत होते, त्यावेळी गांधीजी सामन्याचे अश्रू पुसत होते. त्यांना स्वराज्यापेक्षाही माणुसकीचा धर्म मोठा वाटत होता.

मला गवसलेले गांधी ;

गांधीजींची आत्मकथा वाचताना लहानपणी त्यांनी सोन्याच्या कड्याचा तुकडा चोरून विकला होता, बाहेर मांसाहार केला होता, हे वाचनात आलं. मी लहानपणी घरात काही चोऱ्या केल्या आहेत. त्याची खंत अजूनही वाटत असते. गांधीजींना चोरीचा पश्चताप झाला आणि स्वतः होऊन वडलांपाशी जाऊन गुन्हा कबूल केला तो त्यांच्या आणि वडलांच्या अश्रूत वाहून गेला. हे वाचून मी शहारलो. गांधी आपल्यासारखेच चुका करणारे होते; पण मग ते ‘महात्मा’ कसे झाले ? तर स्वतःमधल्या चुकांकडे स्वतःच परखडपणे पाहणं आणि दुरुस्त करायचा प्रयत्न करणं, ही स्वतःस सतत शुद्ध ठेवण्याची प्रक्रिया त्यांनी लहानपणापासून चालू ठेवली. म्हणून ते विश्वव्यापी झाले. आपण तसे करू का ?

आपल्याला काही गांधीजी व्हायची आवशकता नाही. फक्त कालच्या पेक्षा आज चांगला माणूस व्हायचंय ! मी दिवसाकाठी बऱ्याच चुका करतो. कधी माझ्यामधल्या अहंकाराच तर कधी कावेबाजपणाचं, कधी उथळपणाचं, तर कधी इतरांवर इम्प्रेशन मारणाऱ्या स्वभावाचं दर्शन होऊ लागतं. ज्या व्यक्तींना माझ्याकडंन त्रास झाला असेल तर नंतर त्यांच्याकडे जाऊन कधी माफी मागू लागलो, तर कधी खंत व्यक्त करू लागलो. काही चुका परत परत होताना दिसतात. त्या मी ओलांडू शकत नाही पण त्या चुका आहेत, एवढं तरी मनाला जाणवू लागलं. या प्रक्रियेत अध्यात्म कुठेच नाही. काय करायचाय मोक्ष आणि जन्म-मरणाच्या फेऱ्यांतून सुटका ? त्यापेक्षा चांगला माणूस किंवा चांगला होऊ इच्छिणारा माणूस म्हणून जगूयात की. हे गांधीजींचं माझ्यावर ऋण आहे !!

ह्या महात्म्याच्या जन्मदिनी त्यांस त्रिवार वंदन 🙏🙏🙏

..विनयकुमार खातू

( २ ऑक्टो. २०१८, गांधी जयंती )

2 thoughts on “मला गवसलेले ” गांधी “

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s