“ जंगलातलं भुतं “

नजिकच्या काळात माझे रायगड जिल्ह्यातील एका अभयारण्यात जाणे झाले. तेथिल इनचार्ज असलेले वनअधिकारी माझे चांगले मित्र असल्यामुळे तेथिल वनविश्रामगृहात माझी राहण्याची सोय झाली. जंगलात दौरा करणाऱ्या वन-अधिकाऱ्यांसाठी विश्रामगृह बांधलेले असते. ही विश्रामगृहे नदीकाठी किंवा उंच डोंगरावर बांधलेली असतात. तिथून आजूबाजूचं सुष्टी सोंदर्य पाहाता येत. ते वनविश्रामगृह अगदी आतमध्ये जंगलात आहे. तिथे पर्यटकासाठी साधे व वातानुकुलीत टेंट सुध्दा उपलब्ध आहेत. परंतु मला शासकीय विश्रामगृहात रहायला आवडते. ह्या विश्रामगृहांशी भुताटकी आणि

अद्रुष्टाच्या कथा गुंफलेल्या असतात. एकटा अधिकारी तिथे रात्रीच्या मुक्कामाला राहण्याचं धाडस करत नाही. तिथं राहिला तरी रात्री झोप येत नाही.

त्या दिवशी मी त्या वनविश्रामगृहात राहण्याची इच्छा प्रकट केली आणि चौकीदारांन मला सांगितले, “साहेब मध्यरात्रीनंतर इथे नर्तिकेच्या पायातील घुंगराचा आवाज येऊ लागतो”. मी त्याला विचारलं ही नर्तकी कोण?

तो म्हणाला होती एक अशीच तिचा इथे खून झाला होता. तेव्हापासून रोज मध्यरात्रीनंतर विश्रामगृहात घुंगराचा आवाज येतो. त्यामुळे रात्री कोणी अधिकारी इथे मुक्कामासाठी थांबत नाहीत. दिवसभराची काम उरकून ते सायंकाळी निघून जातात.

साधारण 1986 च्या दरम्यान बांधलेल ते विश्रामगृह घनदाट जंगल असलेल्या एका टेकडीवर उभ आहे. उंच जोत्यावर शहाबादी फरशीचा चौफेर रुंद व्हरांडा त्यावर लाल कौलांच छप्पर. मध्यभागी मोठी खोली त्या खोलीत मच्छरदाणी लावलेले दोन पलंग. भिंतीला लागून कमी उंचीचे दोन टेबल. त्याला जोडून असलेल्या एका चौकोनी खोलीत स्नानगृह. समोर पाहिलं की दीडदोनशे एकराच खुलं रान त्यात उंच गवत वाढलेल. त्यातून पसरलेली बोरीची आणि इतर रान झाड. मध्यभागी आदिवासींचा एक देव. बुजलेली विहीर. विहिरीजवळ एरंडाची दोनतीन झाडं. ही सारी वैशिष्ट्य पाहिल्यावर इथे फार वर्षापूर्वी वसलेलं आणि नांदत असलेलं गाव आता काळाच्या ओघात गडप झालं,याची कल्पना येते. विश्रामगृहाला लागून एक ओढा आणि तिथून घनदाट जंगलाला सुरवात झालेली.

माझी संशोधक वृत्ती मला स्वस्थ बसू देत नाही. वाटलं या अदृशाचा अनुभव घ्यावा.

मी चौकीदाराला म्हणालो, “ माझा अशा गोष्टीवर विश्वास नाही.मी आज रात्री इथेच थांबणार आहे माझ्या जेवणाची तेवढी सोय करा.”

सायंकाळपर्यंत पायी व वनविभागाच्या जीप ने अभयारण्य पाहून झाले होते. मी परत विश्रामगृहात आलो होतो. चौकीदारनं व्हरांड्यातील आणि आत मधील लाईट्स लावल्या. व्हरांड्यात एक बल्ब होता त्या अंधुक प्रकाशात मी समोरच्या जंगलाकडे पाहत होतो. इतक्यात भेकरांचा एक कळफ जंगलातून ओढ्याकाढे जाताना दिसला. तीन चार भेकर दोन पायांवर उभी राहून बोरीचा पाला खाताना दिसत होती. गवतात चरता चरता एक भेकर तोंडात पाला घेऊन विश्रामगृहाकडे पाहत होत. ते ओरडलं तस कुत्र्याच्या भूकण्यासारखा आवाज झाल्याचा भास झाला. म्हणून मी इकडेतिकडे पाहू लागलो. अतिशय वेगाने उड्या मारीत ते जंगलात दिसेनासे झालं.

अंधार वाढू लागला तसा चूक चूक चूक असा रातवा पक्षाचा आवाज ऐकू येऊ लागला. निळ्या आभाळात चांदण्या लुकलूकताना दिसू लागल्या. जिकडे तिकडे विलक्षण शांतता होती.

रात्रीचे जेवण आटपून मी पलंगावर आडवा झालो. मोबाईला रेंज नव्हती. सोबत नेलेल्या जेबीएल स्पीकरला ऑक्सने मोबाईला कनेक्ट केलं आणि महंमद रफी,मन्नाडे शांत आवाजात ऐकत बसलो.

पावसाळा अजून पूर्ण संपला नव्हता. म्हणून मी चौकीदाराला दार -खिडक्या लावून घेण्यास सांगितले. उशाजवळ टेबलावर एका तांब्यात पाणी ठेवून चौकीदार विश्रामगृहाच्या परिसरात थोड्या अंतरावर असलेल्या त्याचा खोलीत निघून गेला. त्याचं घर शेजारील गावात कुठेतरी होतं. त्याची बायको आणि दोन लहान मुलं तिकडे होती. त्याच्या खोलीत एक बल्ब होता. त्या प्रकाशात त्याचं कुत्रं तिथे बसलेलं दिसलं.

मी पलंगावर आडवा झालो खरा पण झोप येत नव्हती. गाणी बंद करून पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात लक्ष लागत नव्हतं. मग लाईट बंद केली आणि फोनच्या टॉर्चच्या प्रकाशात मी वर छपराकडे पाहत होतो. छपराला लाकडाचं आडं लावलं होत. छप्पर तसं उंचावर होत. तरस चौकीच्या आजूबाजूला वावरत असल्याची सूचना कुत्रं मधूनमधून भुंकून देई.

मी माझ्या सॅक मधून कमांडर टॉर्च काढला. त्याच्या उजेडात दूरवरच सहज दिसत. टॉर्च माझ्या उशाजवळ ठेवला. पुन्हा अंथरुणावर पडलो. मनात ‘ भूभलैया ‘ पिक्चर मधील ‘माैजुलिका’ नावाचे नृत्य करणारे भूत आणि तिचं ते “आमी जे तोमार, शुधू जे तोमार” गाणं नाचत होतं. वाटलं, ही काळ रात्र कधी संपेल? कधी झोप लागेल आणि कधी जाग येईल? अंधुक प्रकाशात मी खोलीभर नजर फिरवत होतो. आणि मनात त्या चौकीदाराचे मध्यरात्रीनंतर भूत येते हे वाक्य आठवत होतो. विचार करत होतो ती नर्तिका कशी दिसत असेल ? ती सुंदर असणार. अशा अदृष्ट व्यक्ती कधी वृद्ध होत नसतील काय?

मला केव्हातरी डोळा लागला. झोपेच्या तंद्रीतचं मला घुंगुरांचा आवाज ऐकू येत होता. हे सत्य की केवळ आभास?मी अंथरुणावर उठून बसलो. तो आवाज आता स्पष्ट ऐकू येत होता. त्यात पदलालित्य नव्हतं. म्हणजे नर्तिका धावत जावी आणि एकदम थांबावी असा तो आवाज होता. मी घुंगराच्या आवाजाचा वेध घेत होतो. आवाज जवळ जवळ येत होता. तो नंतर व्हरांड्यातून येउ लागला. उठून दारं आणि खिडक्या नीट लावल्याची खात्री केली. ती येईल तर दारातूनच येईल ना !

आता छपरावरून घुंगरांचा आवाज येत होता. मी टॉर्चचा प्रकाश त्या आवाजाच्या दिशेने पाडला. एक मुंगूस आढ्यावर चढून छपरात लपलेल्या उंदराचा पाठलाग करीत होत. त्याच्या गळ्यात घुंगराचा पट्टा होता. त्याच्या प्रत्येक हालचाली बरोबर घुंगरू वाजत. नंतर मुंगूस उंच असलेल्या व्हेंटिलेटर मधून बाहेर पडलं अन खरी गोष्ट लक्षात आली.

दुसऱ्यादिवशी त्या मुंगसाबद्दल चौकशी केल्यावर चौकीदार कबुल झाला. ते मुंगूस चौकीदारानं पाळलं होत. त्याच्या अस्तित्वाचा सुगावा लागावा म्हणून त्याने मुंगसाच्या गळ्यात घुंगराचा पट्टा बांधला होता. विश्रामगृहात माणसांची वर्दळ नसल्यामुळे रानउंदरांचा सुळसुळाट झाला होता. त्यांना खाण्यासाठी चौकीदार त्या मुंगुसाला मध्यरात्रीनंतर सोडून देई. कोणी अधिकारी रात्री मुक्कामाला राहू नये आणि त्याला कुटुंबापासून लांब रानात रात्र काढायला नको म्हणून त्यानंच नर्तकीची कथा रचली. त्याची चोरी पकडली गेल्याने तो घाबरला होता. त्याच्या वरिष्ठांना मी ही गोष्ट सांगितली असती तर त्याच्यावर कारवाई झाली असती. म्हणून तो माझी क्षमा मागू लागला. पुन्हा तो असे करणार नाही आणि वनाधिकारी व इतर पाहुणे ह्यांची प्रामाणिकपणे सेवा करेल ह्या हमीवर मी ती गोष्ट कुणाला तिथे सांगितली नाही. परंतु त्याच्या कल्पकतेचे मला कौतुक वाटले आणि हा अनुभव लिहिण्यास भाग पाडले !

.. विनयकुमार खातू

One thought on ““ जंगलातलं भुतं “

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s