” देवनारची नर्सरी “

देवनार येथे एक वन खात्याने सजवलेली नर्सरी आहे. गच्च,गर्द,बकाल वस्ती जवळजवळ शंभर एकरावर पसरलेली. सर्वत्र दुर्गंधी. प्लॅस्टिकच्या पिशव्या,फिल्मचे दिसतात तसे दिसणारे रोल ठायी ठायी अक्राळ विक्राळ स्वरूपात पहुडलेले. असे वाटते ते प्लॅस्टिक त्या परिसराला आणि खासकरून झाडांना खावून टाकेल.

हा सर्व झोपडपट्टीचा भाग ओलांडून आतमधे गेलो की वन खात्याने चार एक हजार झाडे लावली आणि जगवली आहेत. वड,पिंपळ,सावर,आंबा,नीम,सुरू आणि बदाम. निसर्गाने या कचऱ्यालाही सामावून घेतले आहे. पानगळ झाली म्हणजे पानांचा गालीच्याच पसरतो या भूमीवर. हळूहळू कचरा खाली दबतो आणि वर सुंदर उपवन तयार झाले आहे.

नाकावर रुमाल बांधून,पायात गमबुट घालून तिथल्या वनअधिकार्यांनी कामे केली आहेत. तिथले एक परिचयाचे वनअधिकारी सांगत होते, “ सुरवातीला माझा स्टाफ नाहीच म्हणत होता ,पण आता कशी डुलतआहेत ही झाडे. वाटत नाही ना कचऱ्याच्या ढिगावर डुलताहेत तेत्यांनी आजूबाजूला फिरून मला हे शहरी जंगल दाखवले.

आता हिच आपली भविष्यातली जंगले. खरी जंगले, कांदळवने तर सगळी नष्ट होत चाललित. आता हीच स्वीकारायची आपण मुंबईमधे माणसाने बनवलेली जंगले. मुंबईमधे रस्त्यालालागून कांदळवनांची झालेली कत्तल मी बऱ्याचदा पहिली आहे. पर्यावरण कायद्यात कांदळवनांची कत्तल हा दखलपात्र गुन्हा आहे तरी देखील राजरोस मॅन्ग्रो कटिंग चालूच आहे. हीच कांदळवने सागराची धूप थांबवतात तसेच सागरातल्या प्राण्यांना आश्रयही देतात. त्याची अंडी यांच्याजवळ सुरक्षित राहतात.कांदळवनांची हानी म्हणजे निसर्गाची हानी. आपल्या येणाऱ्या भविष्याची हानी हे नक्की. पण इथे (मुंबई मधे समुद्रा लगतच्या,खाडीलगतच्या लोकांना समजून घायचेय का काही? तोडा झाडे, पाने, कांदळवने आणि बांधा उच उंच इमारती ! पण माणूस एकटा जगेल काय?आणि किती दिवस? मग येते त्सुनामी,मग येतो प्रलय आणि सगळे गिळंकृत करतो माझ्या मनात हेच विचार चालू होते.

इथल्या नर्सरीतल्या झाडांना वाढवायची, रूट ट्रेनिंगची नवी पद्धत पाहिली. रोपाच्या मुसक्या बांधून त्याला चिमुकल्या पिशवीत कोंबण्याऐवजी त्याच्या मुळांना मुक्त श्वास घेऊ द्यायचा त्यांना हवेतसे पसरू द्यायचे. झाड चार पाच फुटाचे झाल्यावर त्याला रुजवायचे. हे अजिबात सोपं नसत. म्हणजे हल्ली मुली मुक्तपणे शिक्षण घेऊन वयाने मोठया झाल्यावर लग्न करतात त्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित झाल्यावर नवीन घरात रुजतात आणि वाढवतात तसाच हा छान प्रकार, मी मनाशी म्हटले. नर्सरीत झाडावर बरेचसे कावळे स्वच्छंदीपणाने या फांदीवरून त्या फांदीवर उडत होते. तेवढ्यात कुठल्याशा पक्षाचा वेगळाच आवाज मला आला. “ड्रोगोपक्षी म्हणतात त्याला. इतर पक्ष्याचा आवाजाची नक्कल करता येते याला. काळा ,लांब शेपटी आणि तीही मध्ये कातरलेली असा बाज असतो त्याचा.

निसर्गात काळ्या रंगाचे सुद्धा किती कौतुक आहे. देखणा वाटतो तो रंग. पण माणसात?किती वर्णभेद केलाय नाही या रंगांन? माझा स्वतःशीच संवाद चाललेला !

थोडा वेळ मी त्या झाडाखाली बसलो. करंज्याचे झाड पाहिले, त्याचा प्रत्येक भागाचा काहींना काही उपयोग असतो. निसर्गात असेच असते. झाड,पाने,फळे, खोड, फुल काहीच निरुपयोगी नसते. मी निसर्गाच्या त्या रूपाकडे पाहत होतो. झाडांना स्वतःचा असा एक वास असतो. त्याचा एक आवाजही असतो. मी इथल्या आंबा,वड,पिपळ,सावर,नीम आणि सुरू याच्याशी जणू बोलत होतो. त्यांचा गंध हृदयात भरून घेतला. त्या नर्सरीतून निघताना मी सुरुला मिठी मारली. बराच वेळ मी तिथेच गुंगलो होतो. उठावेसे वाटत नव्हते. परतायला तर हवेच होते. जड अंतःकरणाने उठलो आसुडासारखा वाटणाचा काळ्या,रागीट डांबरी रस्त्यावर आलो. गाडी हलली पण मन तिथेच झाडामध्ये,ओबडधोबड चिखलाने भरलेल्या पायवाटात राहिले !!

विनयकुमार खातू (25.9.18)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s