“ ती “

ती नेपाळच्या धनगरी जिल्ह्यातील कुठल्यातरी गावातली. नवऱ्याने तिला सोडले चार मुलं गळ्यात टाकून. दोन मुलगे आणि दोन मुली. मुलांना कसबस तिनं वाढवलं आणि मोठया मुलाचे आणि मुलीचे लग्न लावून दिले. धाकटी दोन मुलं काहीतरी मोलमजुरी करतात तिकडे. घर कसे चालेल ह्या चिंतेने आणि नेपाळपेक्षा चार पैसे जास्त मिळतील ह्या विचाराने ती मुंबईमध्ये तिच्यापेक्षा दहाबारा वर्षांनी लहान असलेल्या पुरुषासोबत २०१३ मध्ये आली. पडेल ते काम,मोलमजुरी करण्याची मानसिकता आणि पक्का निर्धार करून ती सांताक्रुज – कलिना मधे त्या पुरुषासोबत राहू लागली. जाडजुड बांधा आणि काटक देहयष्टी वय साधारण अठ्ठेचाळीस ते पन्नास असेल तिचे आता. तो पुरुष कुठल्यातरी ऑर्केस्ट्रा मध्ये कामचलावू सिंगर आहे. त्याची जेवणाची सोय होईल आणि शरीरसुख मिळेल म्हणून तिला तो मुंबईत घेऊन आला.

माझ्याकडे ती २०१३ ला आली एका ओळखीच्या माणसाकडून काम मागण्यासाठी आणि तिथं पासून कुटूंबाचा अविभाज्य भाग झाली. तिला ‘दीदी’ म्हणतो आम्ही. धुणी – भांडी, कपडे -लादी, झाडू- कटका तिचे काम. तिच्या कामाचा उरक, मेहनत ह्यापेक्षा कामातील सच्चाई वाखण्याजोगी. कधीच कुठले काम तिला सांगावे लागले नाही. पाण्याचा ग्लास रिकामा दिसला तरी लगेच उचलून सिंक मधे टाकणे, थोडा कचरा – धुळ दिसली तर काम उरकले असेल तरी साफ करणे. खाण्यापिण्याची कुठलीही अपेक्षा नाही. शिळं पाकं आनंदाने खाणार अगर घेऊन जाणार. फार कमी बोलणे. कधीतरी चेहऱ्यावर हास्य. आपल्याच विश्वात रममाण. माझे घर झाले की बिल्डिंग मधिल इतर दोन घरात सारखेच काम करणे आणि घरचा रस्ता धरणे तिला माहित. रस्त्यावर चालताना कधी दिसली आणि गाडीचा हॉर्न वाजवला तरी तिला खबर नाही. चेहऱ्यावरील भाव समजण्यापलीकडे. कुठलाच अंदाज बांधता येत नाही. देवाची भांडी लखलखीत करून ठेवणारी पण देवासमोर दिवा लावा अगर सणावाराला घर फुलांनी सजवा तिला कशाचे काहीच नाही. देवाला नमस्कार करताना, देवाऱ्यासमोर उभे राहीलेली मी तिला कधीच पाहीले नाही. देवावर श्रद्धा, विश्वास, राग, लोभ, मागणे ह्या पलीकडील काहीतर तिच्या देहबोलीतून जाणवते. धुवायला टाकलेल्या पॅन्ट किंवा शर्टाच्या खिशात पैसे राहिले तर परत करताना केवळ हात समोर करणे. मी घरी नसल्यास देव्हाऱ्यात ते पैसे ठेवणे. ना शाबासकीची मागणी, ना मला काहीतरी सुनावण्याचा वा हसण्याचा विचार. घरावर संपूर्ण लक्ष असताना, सर्व गोष्टींची काळजी असताना ते दाखवून देण्याचा कुठलाच अट्टहास नाही. २०१३ पासून पगार वाढून द्यावा म्हणून स्वतःची कुठलीच मागणी नाही. मी वाढवून दिलेला पगार मान्य. तो पुरुष जबरदस्तीने तिच्याकडे पैसे मागतो म्हणून तिचा संपूर्ण पगार माझ्याकडे जमा. आणि गरज लागेल तेव्हा मागून घेते ती. एकदा तर संपूर्ण वर्षाचा पगार माझ्याकडे जमा होता आणि त्यात नोटबंदी. जवळ जवळ अंशी हजार रोख रक्कम आणि तिला ती नेपाळला गावी घेऊन जायची होती. रक्साँल बॉर्डर वर चेकिंग चालू आहे अशी तिला माहीती मिळाली. मग तिचे धाबे दणाणले. काय करावे सुचेना. पैसे तिकडे गावी नेणे गरजेचे होते. मला नंतर आईकडून समजले तिने परकरला आतून एक वस्त्राचे अस्तर लावून त्यातून पैसे नेले.

मी दोन वर्षांपूर्वी विपसनेसाठी नेपाळला गेलो होतो. त्याच वेळेस ती देखील सुट्टीवर गेली होती. तिचा मोठा मुलगा शॉक लागून मेला. मी नेपाळमधे असून देखिल तिथे जावू शकलो नाही. मुंबईत परत आल्यावर तिला फोन केला आणि ती धायमोकून रडली. एकदा त्या पुरषाने तिला पैशासाठी दारू पिऊन अंगाला सूज येईपर्यंत मारले होते. सर्व मार सहन केला होता तिने. रात्री बारा वाजता माझ्या घरी आली होती. मी त्या पुरुषाला पोलिसांच्या हवाली करणार होतो पण ती म्हटली, “सर इसके बजसे मुंबईमे आयी, पैसा कमाया, रहेनेके लिए घर है, बस उसको समझावो और छोडदो I” त्यावेळेस ती अजिबात रडली नाही. सहानभूती मिळवण्याचा कुठलाच प्रयन्त तिने कधी केला नाही. पण मुलगा गेला आणि ती खचली. ज्या मुला बाळासाठी तिने घर सोडले त्याची अशी मौत तिला वेदनादायी होती. आता तिच्या चेहऱ्यावर थकवा, वेदना स्पष्ट जाणवतात. काम अजून देखील तेच तसेच सचोटीचे. पण डोळ्यात आता दुःख आणि वेदना स्पष्ट दिसतात. केवळ कर्म करत राहण्याचा तिचा स्वभाव बनत चाललाय जणू.

काही दिवसांपूर्वी मी सकाळी साडेसहा वाजता ती राहते त्या झोपडपट्टीच्या भागात माझ्या कुत्र्याला घेऊन वॉकला गेलो होतो. मला तिची खोली कोणती हे माहीत देखील नव्हते. तिनेच हातातील धुतलेली साडी पिळत मला हाक मारली, ” सर आज इस तरफ? चीकू भी आया हैI घर पर आओ चाय पीके जावो I” मी नाही नाही म्हणत होतो. पण तिने आग्रह केला, “सर थोडा घर पर पैर लगावो अच्छा लागेगा मुझे I” मी तिच्या खोलीच्या दारातच उभा होतो. दहा बाय दहाची देखील नसेल खोली. आतमधे तो पुरुष झोपला होता. तिने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण मीच नको म्हटले. समोर मी दिलेली एक प्लॅस्टीकची खुर्ची आणि सर्व सामान. कोपऱ्यात तिचा स्टोव्ह आणि सर्व डबे. कडेला एक मोरी त्यावर दोन हंडे. डाव्या हाताच्या भिंतीवर एक आरसा, उजव्या हाताच्या भिंतीवर सलमान, शाहरुख, हृतिक आणि दोन नेपाळी हिरो – हिरॉईनचे फोटो. बास संपले. एवढेच त्या अंधाऱ्या खोलीत. मी चहा घेत नाही हे समजल्यावर तिने हातावर साखर दिली. मी म्हटले, दीदी घर अच्छा रखा है I तिच्या डोळ्यात पुन्हा कुठलेच भाव नाही. मी घरी परतलो. मनात विचार आला माझा मोठा फ्लॅट, त्यातील महागडी सजावट,वस्तू आणि घरातील खानपानं हे पाहून ती रोज परत त्या अंधाऱ्या खोलीत जाते आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ह्या लखलखटात येते.

त्याच दिवशी मला काही दिवसांसाठी बाहेर गावी महत्वाच्या कामासाठी जायचे होते. देवाला नमस्कार केल्यावर घरच्या संस्कारानुसार वडीलधाऱ्यांना पाया पडतो, पण घरी कोणीही वडीलधारे नव्हते. तेवढ्यात ती आली. आणि मी तिला वाकून नमस्कार केला…. तिच्या डोळ्यातील भाव आता मी समजू शकत होतो. तिच्या डोळ्यात समाधान होते..

तिच्या डोळ्यातील समाधान मला काहीतरी सांगून गेले. आपण काम धंद्यामधे आणि एकंदर जीवनामधे समाधानचं तर शोधत असतो. ती पैसे कमावते मुलांसाठी आणि आता ह्यावयात मुलाच्यापाठी सून व नात ह्यांची पण जबाबदारी तिच्यावर आहे. मुंबईत पाठ टेकायला जागा दिल्याच्या बदल्यात त्या पुरषाच्या गरजा भागवते ती. स्वत:साठी अस काहीच नाही. पण प्रेम आणि सन्मानाने तिला समाधान मिळते हे मी त्यादिवशी जाणले होते. मग मी आणि कुटुंबीयांनी तिला प्रेम आणि सन्मान द्यायचं ठरवलं. बिल्डिंग मधील इतर नेपाळी वॉचमन तिच्याकडे वकवकलेल्या नजरेने बघत. त्यांना एकदा फयलावर घेऊन तिला तिच्या पाठीशी कोणतरी असल्याची हमी दिली. मनापासून तिच्या परिश्रमाचे आणि सचोटीने काम करण्याचे कौतुक करायला सुरवात केली. जेवढे जमेल तेवढे तिच्याप्रती कृतज्ञ रहायचे ठरविले. नातेवाईक व मित्र घरी आले की तिची ओळख हमारी बडी “दीदी” म्हणून करून देऊ लागलो. सणावाराला तिला साडीचोळी आणि गोडधोड नचुकता देऊ लागलो. ती आता ह्या प्रेमामुळे अन कौतुकामुळे सुखावली. चेहरा खुलला. ती वरचेवर हसू लागली. डोळ्यात समाधान दिसू लागले.

अनेक गोष्टींमधे कायम समाधान शोधणारा मी तिच्या समाधानात माझे समाधान मानू लागलो !!

©️विनयकुमार खातू (7.9.18)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s