“ तो “

तो आजसुद्धा भेटला मला. दर पावसाळ्यात भेटतो. मी पावसाळ्यात मुंबईगोवा हायवे ने अलिबागला जाण्याऐवजी उरणकरंज्याहून रेवस बंदरावर होडी (तर) ने जाणे पसंत करतो. तो होडीत तिकिट फाडतो. हाफ हाताचा शर्ट,खाली हाफ चड्डी,पायात कधी चप्पल कधी बीनचपलीचा,हातात सिल्व्हर मेटल बेल्टचे घड्याळ. आजपर्यंत तो एकही शब्द बोललेलामला आठवत नाही. मी त्याला मागील पाच वर्षे पाहतोय. केवळ हात समोर करतो तो. लक्ष नसल्यासहाताला स्पर्श करतो आणि तिकिट अर्धे फाडून परत करतो. कोण काय बोलते,विचारते ह्याच्याशी त्याला काहीच पडलेले नसते. होडी पावसाळ्यात हलताना प्रवाशांना बसून सुद्धा कसरत करावी लागते आणि तो मात्र उभ्यानंतोल सावरत सर्व तिकिट फाडतो.

तिकिट फाडून झाली की तो एकदम मागे सर्व बसायची बाकडी संपली की एक फळकुट आहे त्यावर उभा राहतो नाहीतर बसतो. पण तो बोलत काहीच नाही. अगदी भावनाशून्य चेहरा त्याचा. काळारंग आणि आता पूर्ण टक्कल पडलंय त्याला. वय असेल पन्नास ते पंचावन्न मधे.

आज मी हिय्या करून त्याच्याशी बोलायचं ठरवलं. तो मागे बसला होता तिथे गेलो.आणि विचारलं काका तुमचे नाव काय ? त्याला काय प्रतिक्रिया द्यावी ते कळेना. तो गप्प. मला वाटले तो मुका आहे. मग मी ठरवलं आपणच बोलत राहू त्याच्याशी, किमान ऐकेल तरी. मी म्हटले, तुम्हाला मी पाच वर्ष ह्या होडीत बघतोय मस्त काम करता, बॅलन्स मस्त जमतो तुम्हाला होडी लाटेने हलत असली तरी ! तुमचे नाव गाव काय हो ? आणि त्याने मला आश्यर्याचा सुखद धक्का दिला, “ जगदीशनाव माझा. नवखारला ऱ्हातो. वीस वर्सझाली तरीवं काम करतो.” मला काहीच बोलायचे नव्हते फक्त त्याला ऐकायचे होते. मी म्हटले, कंटाळा आला नाही का ह्या तरीचा ? तो म्हणतो, “कशाला कंटाळा ? सकाली सात पासनं ते संध्याकाली साडेसहा वाजे पातूर काम, मग लावायची नवटाक आणि म्हावरा खावुन झोपायचा. बायको मेली धा वर्षा पहीले आणि मुलगा दुसरा बिऱ्हाड करून उरनशी ऱ्हातो.” मी विचारले, मग जेवण ? तो म्हणतोआपला आपण मस्त करतो. सुट्टी बिट्टी काय मारत नाय.” पगार कीती? तो म्हणतो, “आता आठ हजार झालाय.”

तेवढ्यात रेवस बंदर आले आणि त्याची गडबड सुरु झाली. नवीन प्रवासी,नवीन फेरी अन तीच तिकिट, तेच तिकिट फाडणं, सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत केवळ तेच अन तेच वीस वर्षे तेच. कोणतीही तक्रार,त्रागा करता, निर्विकारपणे तो हे करत आलाय. त्याला कधीच तिकिट फाडण्याचे कामापुढे होडी चालवणे शिकावे वाटले नाही. दुसरीकडे जास्त पगार मिळत असेल का ह्याची चौकशी पण करावी वाटली नाही. कडेला उभे असणारे मासे पकडायला जाणारे टोलर आणि त्यावरील लोकांचा कलकलाट त्याने रोज पहिला आहे. त्याला त्याचे सोयरेसुतक नाही, कुतुहल नाही. सुसाट जाणाऱ्या स्पीड बोटींकडे तो पाहत सुद्धा नाही. दहा ते पंधरा मिनिटांचा प्रवास संपायच्या आत शेदिडशे प्रवाश्यांची तिकिटे फाडणे फक्त एवढेच त्याचे विश्व, एवढेच त्याचे काम आणि एवढीच त्याची कर्तबगारी !

रेवस धक्क्यावर उतरून न्यायला आलेल्या माझ्या गाडीत बसलो पणतोनजरेसमोरून जात नव्हता. का कुणास ठावूकत्याची ती जीवनावरची श्रद्धा आहे की जीवनाकडून काहीच अपेक्षा नाही त्याला ? फेरी बोटींचे वाढते प्रमाण, स्पीड बोटींची उपलब्धता आणि प्रवाशांसकट गाडया वाहून नेणारी भाऊच्या धक्क्यावर येवून ठेपलेली रोरो बोट ह्या परिस्थितीमधे येणाऱ्या काळात कदाचित ह्या होडीचे महत्व ( तर ) संपून जाईल आणि त्याबरोबरतोकुठे असेल माहीत नाही.

एक नक्की त्या अथांग सागरासारखी त्याच्या मनाची खोली मी कधीच मोजू शकणार नाही. मात्र सागराप्रमाणे त्याच्या मनात काय काय लपले आहे त्याचे समुद्रमंथन प्रत्येक फेरीत करण्याचा एक विचार डोक्यात येवून गेला. .

बघुया अमृताचा घट गवसतो की जहर ….. कदाचित काहीच नाही !!

©️विनयकुमार खातू (30.8.18)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s