“ बालपण पाखरांसोबतचे “

माझ्या गावातील शाळेची ईमारत बांधली जात होती तेव्हा आमचा इयत्ता सहावीचा वर्ग गावच्या रवळनाथ मंदिरामधे काही महिन्यांकरिता चालत असे. रयत शिक्षण संस्थेची सद्गुरू अनंत महाराज विद्यालय नाते, ता. महाडरायगड माझी शाळा. तेव्हा त्या देवळासमोर होळीचामाळ आणि तिथे समोरच एक नांद्रुक नावाचा मोठा वृक्ष होता आणि आजदेखील आहे. त्याला मोठा पार होता. या झाडावर सकाळसायंकाळ पाखरांची शाळा भरे. आम्ही एक कविता म्हणत असू :

पाखरांची शाळा भरे नांद्रुकी वरती

चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती.

या झाडावर कावळे, चिमण्या, पोपट, मैना इत्यादी पक्षी जमा होऊन सकाळसायंकाळ मोठा कलकलाट करीत. आमच्या आळीत पपा मांगडे नावाचे गृहस्थ होते. आम्ही त्यांना पपादा म्हणत असू. त्याला कबूतरांचा शौक होता. तो त्याच्या आणि लगतच्या डॉ. वर्मांच्या घरामधील बोळात कबूतरांसाठी बिस्किटांचे खोके लावून त्यात दाणे टाकून ठेवी. ते दाणे खाण्यासाठी सायंकाळी कबूतर जमत असत. ते खाताना तेघुटर्गुआवाज करायचे. शाळेच्या पलीकडे असणाऱ्या विस्तीर्ण शेतीलामलारम्हंटले जाते. त्या मलारात मी आणि माझा मित्र कपिल दाणे घेऊन जात असू. ते खाण्यासाठी तिथं कबूतरं थव्यांनी गोळा होत. मी सायंकाळी मलारात जात असे आणि तासंतास पक्षांकडे पहात बसत असे. नदीपलीकडे

डॉ. खेडेकरांचा दवाखाना आणि घर होते. त्यांच्याकडे कायम पोपट पाळलेला असे. त्यांचा मुलगा आणि माझा बालपणीचा मित्र उदय जो आता पुण्यात डॉक्टर आहे त्या पोपटा सोबत बोलत असे. मला त्याचे कुतुहल वाटत असे. तो पोपट इतका माणसाळला होता की चोचीने हाताचे बोट चावून तो हाताच्या तळव्यावर खांद्यावर सहज बसत असे. मला त्याच्या सोबत खेळणे खुप आवडायचे. आजीच्या कहाण्यांतील पाखरांची घरं शेणामेणाची होती. पण मी प्रत्यक्षात मडक्यात गवत काड्या काटक्यांची बांधलेली पाखरांची घरं पहात असे. घराच्या आढ्याला चिमण्या खोपी बांधत. त्यात अंडीपिल्लं देत. चिमण्यांच्या इवल्याशा पिल्लांना पंख फुटले की ती घरटी सोडून अंगणात उडूबागडू लागत. त्यांची आई दिसताच दोन्ही पंख फडफडवत, चोच वासून तिच्याकडे चारा मागत. उघडलेल्या त्यांच्या चोचीत चिमणी मायेने चारा भरे. घराच्या मागच्या अंगणात उंचच्या उंच निलगिरीचे झाड होते. संपूर्ण गावातील कुठल्याही कोपऱ्यातून त्याचा शेंडा दिसत असे. कावळे त्यावर काड्याकाटक्यांनी घरटी बांधताना दिसत.

माझ्या आईला रानवाटांची माहेरओढ होती. कोकणातील खेडरत्नागिरी हे तिचं माहेर. उन्हाळयाच्या सुट्टीत आम्ही भावंड आजोळी जायचो. भाई मामा माझ्यापेक्षा वयाने कितीतरी मोठा होता. परंतु त्याला देखील पाखरांची आवड होती. मामाच्या अंगणात सागाचे एक मोहक झाड होते. एकदा त्या झाडावर इवल्याश्या पाखरानं खोपा बांधला होता. मी घराबाहेरील माचावर बसून तासंतास बघत असे. हाताच्या अंगठ्याएवढं, काळ्या मण्यासारखे डोळे, बाकदार चोच, किरमिजी रंग.

माझा मामा खेडशहराबाहेरील भोस्ते घाटात मोटार सायकल वरून संध्याकाळी मला नेत असे. त्यावेळेस नुकतेच कोकण रेल्वेच्या रुळाचे काम चालू होते. मी त्या घाटातून खाली बघत असताना पाखरांचे थवेच्याथवे भिरभिरत असायचे. मामा त्याला माहीत असलेली नावे सांगायचा. गुलाबी रंगाच्या भोरड्या, हिरवा रंग आणि लाल चोचीचे राघू, रंगीबेरंगी चिवाळ, शेतातल्या जमिनीवर पडलेले दाणे वेचणारा भुरगुंज्या, मध्येच चितुर भुर्रकन उडताना नजरेस पडायचे.

एरवी शनिवारी सकाळची शाळा सुटली की मी माझ्या गावाबाहेरील सडेमाळावर मोहल्ला आणि वरचेनाते पर्यंत भटकायचो. कधी कधी रानचिमण्यांचा थवा गवताच्या पात्यांवरून उडताना दिसे. पहिल्यांदा वाटे, तो रानचिमण्यांचा थवा असावा. परंतु अगदी जवळून पाहिल्यावर त्याच्या डोक्यावरच्या गर्द पिवळ्या रंगानं त्यांची ओळख होई. गायीम्हशी चरावयास आलेले म्हसकर काका म्हणत, अरे बघ, देवचिमण्यांचा थवा आला ! पंख फडफडवीत त्या सर्व जणी घरटी बांधू लागत. गवताच्या पानाच्या धाग्याधाग्यांनी त्या घरटी विणत. काहीदिवसांनी मठ्ठ वाणाच्या सुगरणी येत. खोप्याच्या छिद्रातून आत प्रवेश करीत. खालून वरपर्यंत तपासून पाहत. जिला जे घरटं पसंद पडलेलं असे तिच्याशी त्याचा अनुनय चाले. ती अंडी घालायला बसली की छिद्रावर झिरझिरीत पडदा पडे. घरट्याचा मधला भाग फुगीर, नंतर हातभर विणलेलं नळकांड. मला ते दुरून गारुड्याच्या पुंगी सारखं दिसे. मी तहानभूक हरपून सुगरणीच्या खोप्याकडे पहात बसायचो. त्यातच सहावीलाअरे खोप्यामधे खोपा सुगरणीचा चांगला, एका पिल्लासाठी तिनं जीव झाडाले टांगला !” अशी बहिणाबाईंची कविता अभ्यासली होती. त्यामुळे सुगरणीच्या खोप्याचे आकर्षण मला लहानपणी खुपजास्त होते. आजसुद्धा माझ्या मुंबईच्या घरातत्याची आठवण म्हणून मी एक सुगरणीचा खोपा भिंतीच्या कोपऱ्यात लटकवून ठेवला आहे.

लहानपणी आजी, आई, काका, मामा, आणि रानावनात भेटणारे गुराखी,शेतकरी आणि गावातील पाखरांची आवड असणारे दर्दी लोकं यांच्यापासून मिळालेले पाखरंपाहणीचे धडे मी आयुष्यभर गिरवत राहिलो. कितीतरी पक्षीनिरीक्षण माझ्यापरीने मी केले. करत आलो. चास, मलबारी धनेश, मैना, बुलबुल, क्रौंच,रोहित, बगळे,माळढोक,मोर, खंड्या, सारस, चक्रवाक, भारद्वाज असे भारतीय पक्षी तसेच क्रेन्स, फालकॉन, फेमिन्गो, क्रेन, ब्लुथ्रोट, ब्लूटेल बी, गूज असे अनेक पक्षी मी विविध ठिकाणी आणि पक्षीअभयारण्यात पहिले. कर्नाळा हे तर माझे विशेष आवडते ठिकाण. तिथे वनविश्रामगृहात वस्तीस राहणे आणि सकाळी लवकर उठून पक्षीनिरीक्षण करणे म्हणजे परवणी असते. डॉ.सलीम अली सुप्रसिद्ध लेखक मारुती चितमपल्ली ह्यांची पुस्तके वाचून हा छंद योग्य मार्गाने जोपासता आला हे मी माझे भाग्य समजतो. आज सुद्धा मुंबईमध्ये , गावाकडे, अलिबागला अगर इतर कुठेही संधी मिळेल तेव्हा मी आणि माझा मित्र क्रिकेटर संजय मांजरेकर पक्षीनिरीक्षण करण्यासाठी भटकंती करत असतो. जाणूनबुजून आजूबाजूच्या वातावरणाशी एकरूप होतील असे कपडे वापरतो. सकाळी भल्यापहाटे पक्षी निरीक्षण सर्वोत्तम होते.

तुम्ही विचाराल, या पक्षी निरीक्षणापासून फायदे काय ? खुप आहेत. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभतं, भल्या पहाटे उठावं लागतं, पक्षी पाहण्यासाठी मोकळ्या रानावनात जावं लागतं, सरोवर,तलाव,नदी आणि समुद्राकाठानं भटकावं लागतं, अवघ्या निसर्गाचं लावण्य पाहावयास मिळणं हा केवढा मोठा आनंद होय. पक्षी पाहण्यासाठी आभाळाकडे पाहावं लागतं, आभाळाचं सौंदर्य पक्षी निरीक्षणामुळे समजतं. आपण पाखराप्रमाणे प्रवासी बनतो. आपल्याला उत्तम आरोग्य लाभलं, आनंद मिळाला, निसर्गातील सौंदर्य आणि गुढता जाणवली तर जीवनात आणखीन काय हवं !

©️विनयकुमार खातू (21.8.18)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s