“पक्षी आणि आपण “

ना घर मेरा

ना घर तेरा

दुनिया रैन बसेरा !

माझा मित्र माजी क्रिकेटर संजय मांजरेकर ह्यांच्या पक्षी निरीक्षणाच्या छंदामुळे तो अलिबाग आणि इतरत्र भेटीअंती माझ्याशी नवनवीन पक्षांबद्दलबोलत असतो. त्याच्या सहवासामुळे मला पक्षी निरीक्षणाचा छंद जडला आहे. ह्या छंदापोटी मुंबई असो अगर कुठेही फिरत असताना मी सभोवताली दिसणाऱ्या, फिरणाऱ्या पक्षांचे मागिल काही वर्षे निरीक्षण करीत आलो आहे. त्या निरीक्षणाअंती पक्षांकडून आपल्याला कितीतरी गुण घेता येतील असे मला वाटते. त्याबाबत भाष्य करण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न. ( ह्याचे संपूर्ण श्रेय केवळ संजयला जाते )

शिंपी पक्ष्याची घरटी तुम्ही पाहिली असतील. अतिशय सुबक आणि सुंदर असतात. ते घरटं शिंपी पक्षी पानांनी शिवून तयार करतो. मानवाला आता खूप तंत्रज्ञान अवगत झालं आहे. परंतु शिंपी पक्ष्यासारखं घरटं त्याला बांधता येत नाही. पुन्हा इतकं सर्वांगसुंदर घरटं बांधल्यावर पिल्लांची वीण झाली की ते घरटं सोडून जातात. त्यावर कसला लोभ नाही. पाखरांची ही घराबद्दलची वृत्ती संत कबीरांनी वर नमूदकेल्याप्रमाणे मार्मिकपणे व्यक्त केली आहे :

ना घर मेरा

ना घर तेरा

दुनिया रैन बसेरा

पक्षी हेसुखी दाम्पत्यप्रेमाचं प्रतीक आहेत. सारस, चक्रवाक आणि हंसाची जोडी एकदा तयार झाली की ते आयुष्यभर एकमेकांना साथ देतात. त्यातील एकाचा मृत्यू ओढवला तर दुसरा पक्षी आपल्या साथिदाराच्या विरहांन झुरुन झुरुन मृत होतो. पाखरांच्या जगात व्यभिचार नाही. एकपत्नीव्रत किंवा एकपतीव्रत आपण पाखरांन पासून शिकावयाला हवं.

जोडी जमली की पाखरं आपलं घरटं स्वतःच बांधतात. घरटं बांधताना गातात, नाचतात, इकडून तिकडे स्वच्छंदपणे उडतात. मादी त्यात अंडी घालते. दोघं मिळून ती उबवितात. पिल्लांचे संगोपन करतात. त्यांना पंख फुटेपर्यंत प्रेमाने वाढवीतात. मादी दगावली तर नर त्यांच संगोपन मातेच्या आत्मीयतेनं करतो. दोघंही दगावली तर शेजारच्या घरट्यातील पक्षी त्या पिल्लांना चारा भरवितात. पक्षी हे मूर्तिमंत वात्सल्याचं प्रतीक आहे.

स्वच्छता हा गुणदेखील आपण पक्षापासून घेण्यासारखा आहे. पक्षी घरट्यात कधीही घाण करीत नाहीत. पिल्लांची शीट बाहेर पडेल अशी व्यवस्था करतात. एवढी दक्षता घेऊनही घाण झाली तर चोचीनं ती बाहेर टाकतात.

निसर्गात तुम्हाला एखादा पक्षी घरट्यात आजारी पडून मेलेला कधीच दिसणार नाही. मृत्यू जवळ आल्याचं त्याला कळातच तो दूर अज्ञातस्थळी जाईल आणि कोणाला कळता तिथे निष्प्राण होईल. मृत्यू बद्दल शोक नाही सारं काही शांतपणे घडतं.

पक्षी कर्मयोग्याचं मूर्तिमंत प्रतीक आहे. अगदी अनासक्त वृत्तीनं ते पिल्लांची वाढ करतात. त्यांच्यासाठी जीव द्यायलाही ते कमी करणार नाहीत मात्र पिल्लं जाणती झाली की पालक त्याचा त्याग करतात. मायामोहाच्या बंधनात ते पडत नाहीत.

असंग्रह वृत्ती हा त्यांचा आणखीन एक गुण वाखण्याजोगा आहे. माणसाप्रमाणे त्यांना उद्याची चिंता नाही. जगात प्रत्येकजण आपला संसार कसा चालेल या चिंतेत असतो. ती सकाळी भुकेल्या पोटांन बाहेर जातात आणि सायंकाळी पोट भरून सुखानं परततात. तरीही ती किती आनंदी असतात.

जीवन जगत असताना पाखरं दुसऱ्याकरिता करीत असलेली कर्तव्य देखील मोठ्या निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे पार पाडतात. कबुतरं आणि पाकोळ्यांचा उपयोग युद्धकाळात टपालांची नेआण करण्याकरिता केला जात असे. हे पक्षी कधी शत्रुपक्षाला फितूर होत नाहीत. एका जर्मन औषधकंपनीनं कबुतरांचा उपयोग औषधी गोळ्यांची निर्मितीविषयक तपासणी करण्याकरिता केला आहे. मशिनमधून औषधी गोळ्या बाहेर येतात. कबुतर ते पाहत असतं. एखाद्या गोळीत जरदोष असेल तर ती चोचीनंबाजूला सारतं.

पक्षी हे सौंदर्याचं प्रतीक आहे. पाखराइतकी रंगातील विविधता सृष्टीत इतरत्र तुम्हाला आढळून येणार नाही. एका कवीनं त्याच वर्णन केलं आहे :

सुंदर ही झाडे I सुंदर ही पाखरें I

किती गोड बरे I गाणे गाती I

पक्षाच्या शरीराची किंवा पंखांची मोडतोड झाल्याचं कधी आढळून येणार नाही. एकाच कुळातील पक्षी कसे एखाद्या साच्यातून काढल्याप्रमाणे एकसारखे दिसतात. त्यांचं आरोग्य, रूप आणि शरीराचा डौलदारपणा हेवा वाटावा इतका सुंदर असतो. म्हणून पक्षाला खरोखरीचा योगी म्हटलंआहे. मयूरासन क्रौंचासनइत्यादी आसनं आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी मोर आणि क्रौंच पक्षाकडून घेतली आहेत.

भविष्याच ज्ञान पक्षांना उपजत प्राप्त होतं . सहावं इंद्रिय प्राप्त झालेलं ते अंतरज्ञानी आहेत. मानवाला मात्र ते खगोलशास्त्राद्वारे प्राप्त करून घ्यावं लागतं. सृष्टीतील अनेक घडामोडीचं ज्ञान ती घटना घडण्यापूर्वी आपणांला मिळू शकत नाही. भूकंप होण्यापूर्वी त्याच ज्ञान पाखरांना एक दिवस अगोदर होतं. त्यावेळी पाखरं अस्वस्थ होतात. आपल्या घरट्यांचा त्याग करून आभाळात सैरावैरा उडू लागतात. समुद्रावरील वादळी पाखरू येणाऱ्या वादळाची पूर्वसूचना देतं. चातक पक्षी पावसाचं आगमन सांगतात. कावळ्यांनी आपली घरटी निष्कंटक झाडावर बांधली तर त्यावर्षी पाऊस चांगला पडतो. परंतु एखाद्या वर्षी सावरपांगाराबाभूळ अशा काटेरी झाडांवर किंवा सुकलेल्या वृक्षांवर त्यांची कोपट दिसू लागली की समजायचं की त्या वर्षी अवर्षण पडणार. जन्मापासून ते मृत्यू पर्यंत आपण पक्ष्यांपासून शिकत असतो. आज्ञाधारक हा गुण पक्ष्यांपासून घेण्यासारखा आहे. पाखरांची पिल्लं मोठी आज्ञाधारक असतात. मातापित्यांच्या आज्ञेचं पालन करणे म्हणजे त्यांच्या नशिबी मृत्यूचं होय. ‘ आज्ञापालन म्हणजे जीवनअसं त्यांचं सूत्र आहे. शत्रू कोण ? मित्र कोण ? चांगलं काय ? वाईट काय ? हे सारं त्यांना लहानपणापासून शिकविलंजातं . पाखरांत शिस्त आहे. म्हणूनच ती एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात स्थलांतर करतात. स्थलांतर करताना बाणाच्या आकाराची व्यूहरचना करतात. टोकाला वृद्ध आणि शहाणा पक्षी असतो. तो साऱ्या थव्याचं संचालन करतो. मार्ग दाखवितो. त्याला आकाशातील ग्रहतार्यांविषयीचं ज्ञान असतं. त्याला हवामानाचा अंदाज असतो. त्याच्या सूचनेप्रमाणे इतरांना शिस्तीत वागावं लागतं. जर शिस्तीत वागलं नाही तर एवढा दीर्घ प्रवास करणं त्यांना शक्य होणार नाही.

शिस्तीबरोबर एकीचं बळ येतं . पंचतंत्रातील एका कथेप्रमाणे एकदा चित्रग्रीव नावाचा कबुतरांचा राजा आपल्या थव्याबरोबर पारध्याच्या जाळीत सापडला. परंतु त्याच्या सुचने प्रमाणे साऱ्या कबुतरांनी सर्व शक्तीनं त्या जाळीसह हवेत उडून प्राण वाचविले.

एकूण काय आपण आपल्या सभोवतालच्या पाखरांचे मग घरी येणाऱ्या चिमण्या असोत , कावळे असोत अगर आकाशात उंच उडणारे बगळे असोत वा इतर दृष्टीस पडणाऱ्या कोणत्याही पक्षाचे बारीक निरीक्षण केल्यास आपल्या जीवनास मार्गदर्शक अशा अनेक गोष्टी शिकावयास मिळतील.

…©️विनयकुमार खातू (16.7.18)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s