” कनकेश्वरचा डोंगर ” ( http://epaper.raigadtimes.co.in/index.php/2018/08/29/raigad-times-29-august-2018/ )

अलिबागला नुसता समुद्र आहे असे नाही. सुंदर डोंगरही आहेत. एकाआड पत्ते लावावेत तसे. कनकेश्वर, सिद्धेश्वर, रामधरणेश्वर. त्यांच्या मधुन धावतात दऱ्या. डोंगरांची मालिका आहे. मला भावणारा कायम बोलावणारा तो कनकेश्वरडोंगर.

कनकेश्वर डोंगरावर असणाऱ्या शंकर मंदीराचा इतिहास मला माहित नाही. परंतु समर्थ रामदासांच्या खालील उक्ती प्रमाणे कोणतरी संत महात्मा येथे येऊन आजूबाजूच्या सृष्टी सौंदर्याचं अवलोकन करीत असता ध्यानात नक्की जात असावा. समर्थ अशा डोंगरकपारी राहून लेखनसमाधी लावत असत. सृष्टी सौंदर्याचे कितीतरी क्षण त्यांनी दासबोध आणि श्रीसमर्थ ग्रंथ भांडारात टिपले आहेत. यात्रा सुरु असताना समर्थ आसपासच्या डोंगरात राहत आणि चाफळ च्या यात्रेचं वर्णन करताना म्हणतात :

दास डोंगरी राहतो I यात्रा देवाची पाहतो I

देव भक्तासवे जातो I ध्यानरूपें I

असेच काही कनकेश्वर मंदीराची स्थापना करणाऱ्या संत महात्म्याचेझाले असेल अशी माझी वैयक्तीक श्रध्दा आहे.

पावसाळ्यात कनकेश्वर डोंगरावर जाणे म्हणजे स्वर्गीय आनंदाचा ठेवा असतो. आता पावसाळ्याचे दिवस सरायला लागले आहेत. ऑगस्ट जवळजवळ संपायला आलाय. अलिबागरेवस रस्ता तारूण्याने मुसमुसलेला असतो. मला डोंगर कपारी ट्रेकिंग करणे खुप आवडते. त्यामुळे जाताना भराभरबाराशे फुट उंच, सातशे ते साडेसातशेपायऱ्या चढून जाणे मी पसंत करतो. आणि येताना रमत गमत येतो. कनकेश्वर गड चढायला लागलो की थंडगार वारा अंगाला बिलगूलागतो. वर्षाऋतूमुळे झाडांनी, वेलींनी नवी हिरवीगार वस्त्रे परिधान केली आहेत. दऱ्यातून ओसंडून वाहणारे जलप्रपात, खाली उतरलेले ढग आणि धुक्याने निर्माण केलेली गुढ शांतता. या शांततेचा भंग करत मध्येच ओरडणारा एखादा पक्षी. कनकेश्वर डोंगराचे दर्शन असे भंग करून टाकतो.

इथले जंगल अजूनही माणसाच्या स्पर्शाने उध्वस्त झालेले नाही. बॉर्न फ्री म्हणतात ना तसा तो पहाड त्यावरची वनसृष्टी. इथली वनसृष्टी इतर जंगलासारखी पण माणसांना घाबरणारी, बुजणारी. या निसर्गाला बारा महीने कनकेश्वर महारांच्या दर्शनाला येणाऱ्या माणसांची वर्दळ सतत परिचयाची असल्यामुळे बिचकत नाहीत इथली पानेफुले. श्रावणातइथे श्रद्धाळू दर सोमवारी गड चढून जातात.

डोंगर माथ्यावर पोचे पर्यंत पावसाला सुरुवात झाली. माझ्या सोबत दोन मित्र आणि माझा चिकू (कुत्रा )होता. एवढा वेळ प्रसन्न वाटत होते, आता मात्र एक शिरशिरी अंगात भिनू लागली. पण स्वतःला झोकून द्यायचे ठरल्यावर पावसात भिजणे ते काय. कनकेश्वराच्या वाऱ्याला स्वतःची उब आहे, माया आहे. संपूर्ण अलिबागवर त्याची छाया आहे. त्यातूनच त्याच्या उतुंग व्यक्तिमत्वाची ओळख पटते.

वनश्रीने समृद्ध असुन, कनकेश्वर पर्वताला त्याचा गर्व नाही, सहज सुंदर त्या भोलेनाथासारखी त्याची ओळख आहे. उंच उंच वृक्ष येथे आहेत. त्यांचा शेंडा पहायला आकाशाकडे पहायला लागते. त्या वनजरीतून मधून मधून अल्लडपणे वाहणारे झरेत्यांचे गार पण उबदार पाणी आपल्याला बोलावत राहते. सर्व पायऱ्या संपल्या की पाठमोरे पाहिल्यावर उजव्या हाताला दिसणारी मुंबई, डाव्याहाताला अलिबाग शहर आणि आसपासची गावे आणि समोर नजर जाईल तिथपर्यंत केवळ अरबी समुद्र आणि पुन्हा मागे वळल्यावर एक कमान आणि त्यावर हनुमान मंदिराच्या छतावर बसलेली माकडे, आपले कनकेश्वर मंदीर परिसरात स्वागत करतात. लागून असलेला डोहआणि त्यातीलहिरवेगार पाणी वेड लावते. डोंगर कपारीतून, झऱ्यातून साठलेले पाणी जणू शुद्ध पाण्यातले अभ्यंग स्नान, तासंतास पोहतबसावे.

इथल्या झाडांच्या हिरवाईत अनेक छटा त्यांची अनेक रूपे अनेक ढंग. एक एक पान पाहताना मन हरखून जाते. त्या झाडांत गुंतलेल्यालडिवाळ वेली एकमेकांच्या गळ्यात हात टाकून बसल्यासारख्या वाटत होत्या. त्याही रिमझिमणाऱ्या पावसात निवांत भिजत होत्या. कितीतरी वेळ मी त्यांना निरखत होतो. संपूर्ण पहाडावर पसरलेली हिरवाईची वस्ती आणि त्यातून गुंजन करणारी शांतता. काही झाडांना आताशा पानगळीचे वेध लागायला लागलेले दिसले, पण त्यात कुठे सर्वस्व गमावण्याची भीती नव्हती, त्याबद्दल मनात रुसवा नव्हता. जुनी वस्त्र टाकून द्यायची अन नवा श्वास घ्यायचा एवढे त्यांना पक्के माहीत. कुठे कुठे वयस्करझाडे कोसळून पडलेली दिसली. त्यांच्या मरणातही एक सहजपणाचे सौंदर्य होते.

झाडामाडांनी, पशुपक्षांनी नटलेलं हिरवं स्वप्न संपूच नये असे वाट असतानाच पायरयांवरती,झाडांच्या बुंध्यात आणि इतरत्र भीरकावलेल्या पाण्याच्या आणि दारूच्या बाटल्या माणसाच्या असंवेदनशील मनोवृत्तीचे दर्शन घडवीत होते. इथल्या डोहात स्नान करून कनकेश्वराच्या पिंडीवरती नतमस्तक होताना जाणवले की आपणच कृत्रिम आहोत, अनैसर्गिक आहोत. घाण करणारे फक्त आपणच, कचरा निर्माण करणारे आपण, विश्वाला कुरूप करणारे आपणच, क्रूर आणि कपटी आपणच, स्वतःला माणसे म्हणवणारी रानटी जमात आपणच !

©️विनयकुमार खातू (25.8.18)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s