” श्रावणातला रानमेवा “

शाळेतून परत येताना टाकळा उपटून आण हे आईचे बोल आज आठवले. पावसाळ्यात मोकळ्या ठिकाणी,बांधावर सहजगत्या उगवणारा टाकळा. आजी म्हणत असे, “टाकला (टाकळा कोकणात ‘ळ’ ला ‘ल’ बोलणारे आजूनदेखील बरेच आहेत) तिथं उगवला.“ श्रावण मासात कितीतरी वैविध्यपूर्ण निसर्गदत्त उगवणाऱ्या या भाज्यांमुळे आमचा आहार सकस आणि कसदार असे..

गावची शाळा श्रावणातल्या पहिल्या सोमवारी दुपारच्या सुट्टी पर्यंतचं असे. आज सकाळीच गावचे शंकर मंदिर आठवून श्रावणातल्या पहिल्या सोमवारचा रानभाज्यांचा मेन्यू आठवला. कोणत्याही प्रकारचे बीजरोपण न करता, मशागत न करता, न चुकता दरवर्षी उगवणारया आणि वाटाणा, बटाटा, भेंडी,वांगी, फ्लॉवर इ. यांची एक महिन्याकरता का होईना आपसूक जागा बळकावणारया आणि त्याही एकदम मोफत ! अशा कितीतरी रानभाज्या स्मृतीपटलावर त्यांच्या आगमनाचे सनई चौघडे वाजवू लागल्या.

मला आठवते लहानपणी माझ्या आहारात रानभाज्यांचे प्रमाण खूप होते. श्रावणाची चाहूल लागताच पावसाळी रानभाज्या मोठ्या प्रमाणात मुंबई-ठाण्यात दिसू लागतात. एरवी वर्षभर मेथी, शेपू, पालक, चवळी, लाल माठ यांसारख्या अनेक पालेभाज्या रोजच्या जेवणाचा भाग असतात; परंतु खास पावसाळी रानभाज्या खाणे, हा एक वेगळाच अनुभव असतो. टाकळा, शेवरं, कंटोली, भारंगी, फोडशी, कुळू यांसारख्या अनेक भाज्यांची दर्दी खवय्ये मंडळी वाट पाहात असतात. वसई, विरार, पनवेल, कर्जत, नेरळ, अलिबाग या भागांमधून मुंबईच्या बाजारात या भाज्या येतात. जंगलावर उपजीविका करणारे आदिवासी या पावसाळी भाज्या ओळखण्यात पारंगत असतात. आता गावांतील घरेही माती-दगड-शेणाऐवजी सिमेंट काँक्रिटची झाल्याने स्वाभाविकच त्या घरांना मातीचे अंगणही आता उरलेले नाही. त्यामुळे टाकळ्यासारखी भाजीही आता उगवत नाही. परिणामी, गेल्या काही वर्षांत टाकळा पूर्वीइतका येईनासा झालाय.

माझे एक खानदेशातील मित्र रवींद्र सराटकर यांनी परवा चर्चा करताना मला काही त्यांच्याकडील रानभाज्यांची माहिती दिली. दुडीची फुले, करटुली, तांदुळजा,माठला,कुर्डू,तरोटा, रानतोंडली, भूईपालक इ. मी त्यापैकी फारकमी भाज्या खाल्या असल्यामुळे मी त्यावर बोलणे संयुक्तीक होणार नाही.

पांचगणीच्या जंगलात एक झुडूप आढळते, त्यास गोल पेरूसारखे फळ येते. या फळाची भाजी करतात व ती दुधी भोपळ्यासारखी लागते. यास स्थानिक भाषेत ‘चिचू’ असे म्हणतात. याचीच झाडे हिमालयात व नेपाळातही आढळतात. त्यास ‘इस्कूस’ असे म्हणतात. कोकणात करंदा नावाचे एक कंदमुळ जंगलात मिळते. हे गडद चॉकलेटी रंगाचे असते. त्यास मुळे असतात. हे कंद उकळून त्याची भाजी करतात. कोकणात तळ्यामध्ये त्याच्या गाळात एक प्रकारचे कंद होतात. याचे पीठ करून ते उपवासाला खातात. हे पीठ साधारण शिंगाड्याच्या पीठाप्रमाणे लागते. याशिवाय शेवळे नावाचे एक मूळ मिळते. यात सोडियमचे प्रमाण खूप असल्याने ते खारट लागते. कोनफळ हा गुजराती उंदियोचा कंद म्हणून प्रसिद्ध आहे आणि जंगलात कोनफळाचेही कंद आढळतात. जंगलात भांबुर्डेची झुडपे आढळतात. वाल, वांगे, कांदे, बटाटे तसेच इतर काही भाज्या भरून मडक्याच्या तोंडावर भांबुर्डे याचा पाला घालतात. यानंतर हे मडके उलटे वाळलेल्या गवतावर ठेवतात. गवताचीच भट्टी पेटवून मडके चांगले भाजतात. उष्णतेनेही भाजी छान भाजून निघते व त्यास पानांचाही चांगला स्वाद येतो. हे मडके नीट भाजले गेले की नाही, हे चपलेने वाजवून बघतात. ही भाजी रुचकर लागते व यास पोपटी असे म्हणतात. पोपटी मधे चिकन व अंडी कोंबून भरून मांसाहारी पोपटी केली जाते. दादरच्या मंडयीत आणि सेनापती बापट रोडवर ब्रीजखाली ऋषिपंचमीच्या दिवशी या रानभाज्यांचे वाटे विकायला येतात. त्यातील काहींची नावे त्या विक्रेत्यांनाही माहीत नसतात. उंबराच्या कच्च्या बारीक फळांची भाजी, अगस्तीच्या फुलांचे पिठले, अशा पाकक्रिया सध्याच्या युगात इतिहासजमा होत आहेत. रानभाज्यांची नावे सांगणारी व त्यांचे गुण-दोष सांगणारी माणसेही आता अस्तित्वात नाहीत. वनस्पतीशास्त्राच्या व ग्रामीण संस्कृतीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा हा निसर्गठेवाही हळूहळू काळाच्या पडद्याआड जात आहे, हीच खंत आहे.

मला आठवते बालपणी घरातील स्त्रिया ऋषी पंचमीचे व्रत किंवा उपवास करत असत. हा उपवास आपल्या सप्तर्षींचे स्मरण आणि आदर व्यक्त करण्यासाठी केले जाते. वशिष्ठ ऋषींची पत्नी देवी अरुंधतीचीही या दिवशी पूजा केली जाते. ऋषीमुनी अत्यंत साधे जीवन जगत असत. रानात मिळणाऱ्या फळ, भाज्या आणि कंद हेच त्यांच्या आहारात असे. ऋषी पंचमीच्या या जेवणातून एकप्रकारे तत्कालीन ऋषींच्या सात्विक आहाराची आणि त्यांच्या जीवनशैलीची झलक मिळते. शरीरा सोबत आत्म्याची शुद्धता करण्याचे असे हे ऋषी पंचमीचे व्रत आहे. पण हे व्रत फक्त स्त्रियाच करतात, हे काही माझ्या मनाला पटलेले नाही. लहानपणी माझी आजी ऋषीची भाजी चुलीवर मोठ्या मातीच्या भांड्यात बनवायची. फक्त बायकांचाच उपवास असल्याने प्रथम नेहमीचे जेवण आणि नैवेद्य व्हायचा. आजी आणि मोठी काकी आणि इतर बायका मागच्या पडवीत भाज्या सोलत-चिरत बसलेल्या असायच्या. आम्हा मुलांचे आणि पुरुषांचे जेवण एक वाजताच उरकायचे. मग आम्ही सगळी मुलं मागच्या अंगणात डोकावायला जायचो. या बायकांचा हा कुठला खास पदार्थ चाललाय या बाबत कुतुहल असायचं. आजी बोलवायची खायला. पण एकदम लहानपणी भाजीचा रंग आणि त्यातल्या पालेभाज्या बघून पळून जायचो. मग एकदा कधीतरी ऋषीची भाजी चाखून बघितली. आणि हळूहळू ती भाजी आवडू लागली. बरेच जणांना एरवी ज्या भाज्या अजिबात आवडत नाहीत त्या भाज्या घातलेली ‘ऋषीची भाजी’ मात्र आवडते. मीही त्याला अपवाद नाही. आजीच्या त्या मातीच्या भांड्यातील भाजीची चव काय औरचं होती. मी ती चव कधीच विसरू शकत नाही. आणि आज हे तिला सांगायला आजीही नाही आणि मोठी काकीही नाही. ऋषी पंचमीला आजीची आणि काकीची खूप आठवण येते.

©️

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s