” गळाठीचा झिंगा “

बुधवार आणि आयितवार(रविवार) असला की आजी “तुज्या रातीच्या जेवनाची सोय तूच कर” असा स्वालंबनचा धडा गिरवण्यास सांगत असे आणि मी हाताला काय मासोळी लागते का ह्या इरयाद्याने शाळा सुटली की गळ घेऊन व्हाताळीवर बामनाच्या घाटावर तासनतास बसून मासेमारी करत असे !

गळाने मासे मारण्यासाठी जी साधने  लागतात त्यात एक मेसाची काठी, जिला सटका असेही म्हणतात, पाण्याच्या खोलीनुसार तंगूस, गळ, थोडे शिसे आणि आमीष इतक्या वस्तूंचा समावेश असतो. तंगुसाच्या एक टोकाला गळ बांधून त्याच्या वितभर  मागे एक छोटासा शिशाचा गोळा बांधायचा असतो. ह्या गोळ्यामुळे गळ पाण्यावर तरंगत न राहता तळाशी बुडून बसतो आणि  अमिषाकडे (चण्याच्या पिठाचे गोळे आणि बऱ्याचदा गांडूळ) अनेक माश्यांचे लक्ष आकर्षित होते. शिवाय वाहत्या पाण्यात गळ वहात जाऊन वरच्यावर राहू नये ह्यासाठीही शिशाचा फायदा होतो. ज्या ठिकाणी संथ पाणी असेल तेथे शिसे न बांधताही गळ टाकता येतो, परंतु तो पाण्याच्या तळाशी जाईपर्यंत वरच्या थरातले थोडे शिसे बांधणे नेहमीच फायद्याचे ठरते. तंगुसाचे दुसरे टोक सटक्याच्या निमुळत्या टोकाला बांधले की झाली ‘ गळाठी ‘ तयार !

गळाने मासे मारणे ही अगदी सर्वसामान्य आणि सोपी पद्धत आहे. मासे खाण्याची वैयक्तिक गरज भागवण्यासाठी अनेकजण गळाने मासे मारायला जातात. तर काही जण छंद म्हणूनही जातात. तसेच गळाने एकेक मासा मारत बसणे हे जरी व्यावसायिक मासेमारांना परवडणारे नसले तरी त्यावर उपजीविका करणारे अनेक मासेमार आहेत.

   जी माणसे छंद म्हणून मासे मारायला जातात त्यांच्या त्या छंदाचे हळूहळू व्यसनात रूपांतर होते. पण हे व्यसनमात्र प्रत्येकाला लागावे इतके चांगले आहे असे मी म्हणेन. कारण मासेमारीत वेळ घालवणे ह्यासारखे वेळेचा सदुपयोग करण्याचे दुसरे साधन नाही. मी ज्याज्यावेळेस गावाला जातो त्यावेळीस गावच्या नदीवर सर्वांच्या नजारा चुकवून गळ टाकून मासेमारीत बसतो. अलिबाग च्या घराशेजारी असणाऱ्या नसर्गिक तलावात तिनिसांजेपर्यंत गळ टाकून बसण्याएवढा आनंद कशातच मिळत नाही. मित्रांसोबत परराज्यात अगर परदेशात जाणे झाले तरी गळाने मासेमारण्याचा मोह मला आवरता येत नाही !

गळाने मासेमारी करणारा माणूस हा जवळजवळ समाधी अवस्थेप्रत पोहोचलेला असतो. त्याच्यामध्ये आणि निसर्गामध्ये एक प्रकारचे सुखद अद्वैत  निर्माण झालेले असते, अशा उत्कट क्षणी तो एकप्रकारच्या अवीट आनंदाचा धनी होतो ह्यात काही शंका नाही. “निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, त्याने देशोधडी केले मायबापा ” असे गोरा कुंभाराने म्हंटले आहे, पण ज्याने मासेमारीचा संग धरिला तो स्वतःलाही कसा देशोधडी करून टाकतो याची प्रचिती अनेक अभिजात मासेमारांनी घेतली असेल.

    आजच्या धकाधकीच्या जीवनात ज्याला आपल्या दैनंदिन विवंचनापासून निदान काही काळ तरी मुक्ती मिळावयाची असेल तर त्याने टीव्ही समोर बसण्याऐवजी  खुशाल गळाठी खांद्यावर टाकावी आणि मासेमारी साठी बाहेर पडावे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निवडणुकांचे निकाल जाहीर होताच थेट मासेमारीसाठी का निघून जातात किंवा नेपोलियनला हौदात मासे पाळून त्यांचे निरीक्षण करण्याचा छंद का होता याचा तरी त्यांनी पडताळा घेऊन पाहावा.

मी माझ्या गावच्या गांधारी नदी किनारी बसून, प्रसंगी अभ्यास बुडवून तासंतास मासेमारी केली आहे. शिवडा, वाम, शिंगटी,खरबा,खडकपालू, खवल, दांडाली, डाकू, मळा असे एक ना अनेक मासे मी गाळाने पकडले आहेत आणि सागाच्या पानात लपेटून आजी आणि आईकडे चमचमीत सुके आणि कालवण करण्यासाठी मोठ्या हर्षाने दिले आहेत. आज सुद्धा त्या सागाच्या पानावरील हरेक मासा मला आठवतो त्याच्या रंगरूप आणि नावा सकट ! पण गाळाने झिंगा मारण्याएवढे कठीण आणि कौशल्यपूर्ण काहीच नाही…

   

गळाने झिंगे मारणे हा अतिशय वेळकाढू पण कौशल्यपूर्ण असा खेळच असतो. मोठया कोळंबीला झिंगा म्हंटले जाते. तो गळाला लागणे आणि  मिळणे हा एक योगच समजला जातो  त्यामुळे झिंगे जर कधी बाजारात आले तर ते विकत घेण्यासाठी गिऱ्हाईकांची झुंबड उडते.

झिंग कळपाने राहतात. कधी कधी काय होते की आपण दुसऱ्याच माशांच्या शिकारीसाठी गेलेलो असतो. पण तेथे अचानक झिग्यांचा तांडा उपस्थित होतो आणि मग आपली चांगलीच पंचाइत होते. झिंगे गळ गिळू शकत नसल्याने  आपल्या नांग्यांनी ते गळ पकडतात आणि अतिशय वेगाने ताणत नेतात. त्यावेळी मासेमाराला वाटते की एखादा मोठा मासा आपल्या गळाला लागलेला असावा, म्हणून मोठयाने हिसका देतो. पण त्याच क्षणी झिंगा गळ सोडून देतो आणि फक्त हलका झालेला गळच वरती येतो. असे पाच – सहा वेळा झाले की तेथे झिंगा उठलाय हे लक्षात येते आणि मग आपण मासेमारीची शैली थोडी बदलायची असते.

झिंगा ज्यावेळी गळ ताणत नेतो त्या वेळी त्याच्या कलाने तंगूस सैल सोडायचा असतो जो पर्यंत झिंगा गळ ताणत नेतो. तोपर्यंत आपणही तंगूस सैल सोडल्यामुळे आता आपल्याला काही धोका नाही असे झिंग्याच्या लक्षात येते व तो थांबतो.  थांबला की आपण त्याला आणखी थोडा वरच्या दिशेने ताण द्यायचा असतो. त्यावर तो झिंगा पुन्हा अन्य ठिकाणी गळ ताणत नेतो. आपण पुन्हा तंगूस सैल सोडायचा आणि पुन्हा त्याला ताण देताना झिंग्याला आणखी थोड्या वरच्या पातळीवर आणायचे.

प्रत्येक वेळेला ताण देताना झिंग्याच्या लक्षात येणार नाही अश्या तऱ्हेने हळूहळू वर आणायचे असते. अश्या तऱ्हेने त्याला खेळवत खेळवत पाण्याच्या पृष्ठ भागापर्यंत आणले की मग मात्र एक हळुवार लवचिक झटका देऊन त्याला  बाहेर काढायचे असते. एकदा का झिंगा पाण्याच्या माध्यमातून हवेच्या माध्यमात आला की अधिकच घाबरून गळ नांग्यांनी घट्ट धरून ठेवतो व त्यामुळे सर्वांगाने आपल्या तावडीत सापडतो.

नाजूक, गोंडस शेपटीचा, कुरळ्या – कुरळ्या  पायांचा, कवचाला केशरी झुल असणारा, झोकदार झिपऱ्या मिश्यांचा आणि मुलायम गुलाबी – राजस व्यक्तिमत्वाचा झिंगा पाण्यातून वर येताना लांडया स्कर्टमधली, बॉबकट केलेली एखादी अँग्लोइंडिअन पोरगीच बाहेर आली की काय असे वाटते. अर्थातच झिंगा पकडण्यासाठी ज्या कौशल्याने त्याचा अनुनय करावा लागतो त्या कौशल्यानेच जर एखाद्या मुलीचा अनुनय केला तर झिंग्याच्या आधी ती मुलगीच पदरात पडण्याची शक्यता जास्त !

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s