“जगण्याचे नाविण्य”

गावातील नावाजलेले किराणामालाचे दुकान मे. श्रीराम/मनोहर खातू अँड कंपनी …. दुकानात लागणारे सर्व सामान मोठे काका महाड मधील घावूक विक्रेत्यांकडून आणतं. सामान त्याकाळात नव्याने आलेल्या रिक्षा टेम्पोने आणलजायी. काका सामान आणायला गेले आहेत हे दुपार पर्यंत समजून गेलेले असे. मग आम्ही बच्चे कंपनी टेम्पो कधी येतोय त्याची वाट पहात दबा धरून बसलेलो असायचो.कारण गावातील होळीच्या माळावरील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या दुकानापासून ते पुलापर्यंत सर्व सामान खाली झाले की टेम्पोच्या पाठच्या हौदात बसायला मिळणार. त्याच गंमतीपोटी सर्व सामान उचलण्यासाठी उरा पोटावरून हातभार लावत असू. छोटे -छोटे बिस्किटचे बॉक्स , भाजीपाला, पत्रावळ्या इ. आम्हाला झेपेल त्या वस्तू उचलून दुकानात ठेवल्यावर सर्वात मोठा भाऊ गणेश दादा, नाना ताकदीच्या जोरावर साखर, तांदळाच्या
गोणी उचलून आत ठेवताना केवळ श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलल्यावर बाकी गोवळ्यांनी काठी टेकून स्वतः पर्वत उचलण्यास हातभार लावला आहे ह्या अविर्भावात उभे राहणे आणि साखर – तांदुळगोणी उचलताना आम्ही हात लावतानाचा भाव सारखाच असे. केवळ रिक्षा टेम्पोच्या एका अर्ध्या किलोमीटरच्या फेरीसाठी आम्ही मुल माझा लहान भाऊ कृष्णा आणि पण्या, मित्र नवीन,कपिल,निलेश अगदी सिनसीअरली सर्व सामान उचलून ठेवत असू आणि हौदात बसून मोठ मोठ्यानं बोंबा मारत अर्धा किलोमीटर जात असू.
आयुष्यात पुढे बस, AC बस , ट्रेन , AC ट्रेन, विमान, स्वतःच्या लक्झरी गाड्या ह्यात बसताना जी मजा आणि उत्साह नाही वाटला तो त्या रिक्षा टेम्पोत कायम वाटायचा. कारण होते ‘छोटेसे विश्व ‘ ! कारण होते “नाविण्य ” , ह्या नाविण्या पाठी एक जादू होती त्या जादूवर आमचा मनापासून विश्वास होता. काय होती ती जादू ?
आपल्याला आठवतंय लहान असताना आपण जगाचे हे व्यवहार बघून विस्मयचकित झालो होतो ? त्याच्या बद्दल आपाल्याला दरारायुक्त आदर वाटत होता? या मोहमयी दुनियेनं आपल्यावर जादू केली होती. अगदी छोट्या – छोट्या गोष्टींनी आपल्या भावना उचंबळून येऊन आपण आनंदी व्हायचो. देवानं आच्छादलेल्या गवताचं, हवेत भुरर्कन उडणाऱ्या फुलपाखरांचं किंवा एखाद्या अनोळखी पानाचं किंवा जमिनीवरच्या एखाद्या खडकाचं आपल्याला प्रचंड आकर्षण वाटायचं.
 लहानपणी आपला दात पहिल्यांदा पडला त्यावेळी त्या रात्री दाताची परी येणार असं आपल्याला वाटायचं. पऱ्या बागेत हिंडायच्या, पाळीव प्राणी माणसासारखे वाटायचे, खेळण्यांना पण त्याचं त्याचं व्यक्तिमत्व असायचं. स्वप्न सत्यात यायचं आणि मग आम्ही ताऱ्यांना स्पर्श करायचो. आपल हृदय आनंदानं भरून यायचं आणि आपल्या कल्पनाशक्तीला कोणत्याही मर्यादा नसायच्या आणि हे जग जादूमय आहे ह्यावर आपला विश्वास असायचा.
आपण लहान असताना आपल्यातल्या अनेकांना प्रत्येक गोष्ट चांगली आहे आणि येणारा प्रत्येक दिवस आणखी उत्साह आणि साहस घेऊन येईल असा विश्वास वाटत असतो. या सगळ्या जादुई वातावरणातील आनंद कोणी हिरावून घेईल असंही आपल्याला त्यावेळी वाटत नाही. पण … कधीतरी आपण मोठे होतो. अनेक जाबबदाऱ्या, समस्या आणि अडचणींशी सामना करावा लागतो. आपला भ्रमनिरास होतो आणि लहान असताना अनुभवलेली ती जादू कोमेजून जाते, लुप्त होते आणि म्हणूनच प्रौढ झाल्यानंतर मुलांच्या आजूबाजूला आपण असावं असं आपल्याला वाटतं. कारण जो अनुभव आपण कधीकाळी घेतला होता तो पुन्हा अनुभवावा असं आपल्याला वाटतं, भले तो एखादा क्षण का असेना.
जगताना ते “नाविण्य”आपण शोधत राहीलो तर जगणे कसे लहानपणासारखे उत्साही आणि तणावमुक्त होईल हयाचा विचार आज गावातील दुकाना समोर उभा राहून ते टेम्पोत बसायचे आकर्षण स्मरून आला !!
..©️VK