“वलगनीचा शिवडा”

वलगन’ हा शब्द कोठून कसा अस्तित्वात आला आणि त्याचा नक्की अर्थ काय हे मला अद्यापही माहित नाही. किंबहुना मी त्या भानगडीत पडत देखिल नाही. परंतु दरवर्षी न चुकता माझ्या गावच्या गांधारी नदीला जी रायगड किल्ल्याजवळ उगम पावते आणि पुढे सुप्रसिद्ध सावित्री नदीला भेटते ( भेटणे म्हणजे गळाभेट अर्थानेच मिळते ऐवजी भेटते लिहिले आहे). पुर आला की मी गावाकडे वलगनीचा मासा खाण्यासाठी धाव घेतो. साधारण जुलै महिन्यामधे नदीतील माशांचा प्रजननाचा काळ असतो. नदी दुथडी भरून वाहत असते आणि एका जागी थांबून माशाना प्रजनन प्रक्रीया उरकणे कठीण होऊन बसते. यास्तव पाण्याचा प्रवाह वाहता नसेल अशा ठिकाणी ते धाव घेतात. नदीचे पाणी पुरामुळे आजूबाजूच्या शेतांमध्ये घुसते आणि त्या सोबत हे मासे शेतामधे येतात. शेतात आलेल्या माशांची मासेमारी म्हणजे आमच्या गावाच्या भाषेत “वलगन” होय.दरवर्षी वडील वलगन लागली आहे असा फोन करतात आणि मी कितीही महत्वाचे काम असले तरी ते टाकुन गावचा धावा घेतो.

ठाणे,रायगड, रत्नागिरी पट्ट्यात जी गावे नद्यांच्या प्रदेशात येतात तेथे प्रामुख्याने वांब, शिवडा , खवल, पति,झिंगे, मळे, खर्बे, शिंगटी, ह्या प्रकारचे मासे सापडतात. तर सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच नाशिक, औरंगाबाद, जळगावकडे असणाऱ्या धरणांच्या मोठ्या संख्येमुळे आणि जलशयाचा विस्तृत उपलब्धतेमुळे रोहू, कटला,मृगळ ह्या जातीचे मासे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. माशाचा ह्या तीन जाती संवर्धनास सुलभ, भराभर वाढणाऱ्या आणि उत्पन्न मिळवून देणाऱ्या आहेत. त्यामुळे मासे बाजारातही त्या मोठया प्रमाणावर दिसतात. पण चवीच्या बाबतीत बोलायचे तर वांब, मळे आणि खासकरून ‘ “शिवडा ” ह्या माशांना ते मागे टाकू शकत नाहीत.

चवीच्या बाबतीत क्रमवारी लावायची म्हंटली तर माझ्या गावच्या नदीला पुर आल्यानंतर मिळणाऱ्या शिवडा ह्या माशांला जगात तोड नाही. समुद्रातील सुरमई, प्रोम्प्लेट,हलवा, रावस, बांगडा, इ. व जगभरात इतरत्र हिंडून अनेक विध मासे जसा ‘बासा’ फिश वगैरे खाऊन झाल्यानंतर माझे हे विधान एखाद्यास नक्कीच अतिशयोक्ती वाटू शकते. परंतु वलगनीचा शिवडा खाणे ही एक परवणीच आहे. सुके खोबरे, सुक्या मिरच्या, कांदा, लसूण, इ. पदार्थाचा मसाला वापरून तयार केलेले त्यांचे लिपथीपीत कालवण म्हणजे स्वर्गीय आनंदाचा ठेवा असतो.

शिवड्याची वरची तैलयुक्त कातडी अतिशय स्वादिष्ट असते ती नुसती जिभेवर ठेवताच वरच्यावर विरघळून उभ्या देहात सुखद शिरशिरी निर्माण करून जाते. शिवड्याच्या तुकडया मला बर्फीच्या तुकड्याहून कमी वाटत नाहीत. अशा स्वादिष्ट तुकड्यांचा आस्वाद घेत घेत खाताना अन्न हे केवळ उदरभरण नसून यज्ञ कर्म कसं आहे याचा प्रत्यय येतो !  आईच्या हाताचा शिवडा खाऊन झाल्यानंतर हातावर दीर्घकाळ रेगालत राहणारा त्याचा हवा हवासा ओषट गंध,मैफिल संपल्यानंतर ही मनात रेगालत राहिलेल्या

सुरांनसारखाच जीवाला सुखावत राहतो.

गंमत म्हणजे रात्रि तयार करून दुसऱ्या दिवशी शिळा शिवडा खावा असा संकेत आहे. सुमारे आठवडाभर तो जितका शिळा होत जाईल तितका स्वादिष्ट होत जातो. खरेतर चव या संज्ञेचा प्रत्यय शब्दांच्या माध्यमातून घेणे चुकीचे आहे, कारण ती प्रत्यक्ष अनुभवण्याची बाब आहे. असो . चवीच्या बाबतीत शिवड्या खालोखाल वांबीचा क्रमांक लागतो आणि इतर मासे त्यांच्यानंतर येतात. येवढा उल्लेख या ठिकाणी पुरेसा आहे.

मी लहानपणी माझ्या मोठ्या काकांना आणि वडीलांना वलगनीचा शिवडा लागला हे ऐकल्यावर हातातील कामे सोडून पिशवी घेऊन तो विकत घेण्यासाठी सुसाट धावताना पहिले आहे. माणसाला एकदा का माशांची चटक लागली की त्या चवीच्या तावडीतून तो किंवा त्याच्या तावडीतून मासे सुटणे अशक्यप्राय असते. गावातील किराणा मालाच्या दुकानाच्या पडवीत वर्षातील श्रावण महिना सोडल्यानंतर प्रत्येक कातकरी मासेमार दाम्पत्याने बुधवार, शुक्रवार, रविवार हजेरी लावावी असा अलिखित नियम माझ्या काकांनी केलेला होता.बंधू खातूच्या दुकानात न चुकता येणाऱ्या कातकरी जोडप्याना आज देखील मी नावाने ओळखू शकतो. काकांचे ते  आदिवासी भाषेतील संभाषण ऐकले की, काकांनी त्यांना फूस लावून शिवडा मारला की माझ्याकडे आला पाहिजे अशी सक्ती केली होती जणू, ते आठवून खुद्कन हसू येते !

या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष परमेश्वराने शिवड्यामधून पुन्हा मत्स्यावतार घेतला आहे,अशी बातमी समजली तरी पिशवी घेऊन धावणाऱ्या मंडळी मध्ये मी सर्वात अग्रेसर असेन.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s